जी-20 परिषदेदरम्यान घडणार मोठ्या घडामोडी :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि बांगलादेशच्या पंतप्रधना शेख हसीना यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. जी-20 शिखर परिषदेदरम्यान सर्व नेते अत्यंत व्यग्र राहणार आहेत. पंतप्रधान मोदी हे गुरुवारी संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांच्यासोबत तर फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत रविवारी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. स्वत:च्या या दोन्ही घनिष्ठ मित्रांसाठी पंतप्रधान मोदी हे प्रीतिभोजनाचे आयोजन करण्यास इच्छुक असल्याचे समजते.
अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांचे आगमन आणि जी-20 परिषदेच्या समारोपानंतर मॅक्रॉन यांच्या प्रस्तावित ढाका दौऱ्यावर हे प्रीतिभोजन अवलंबून असणार आहे. अध्यक्ष बिडेन यांच्याकरता शुक्रवारी डिनर आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. तर मॅक्रॉन यांच्याकरता मोदींकडून रविवारी दुपारी प्रीतिभोजनाचे आयोजन केले जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याचबरोबर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
युक्रेन युद्धावर चर्चा शक्य
जी-20 परिषदेदरम्यान युक्रेन युद्ध आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरील याच्या परिणामांची चर्चा होणार आहे. या परिषदेत ग्लोबल साउथवर (विकसनशील अन् गरीब देश) लक्ष केंद्रीत करत 17 निरंतर विकासाच्या लक्ष्यांवर प्राथमिकतेची मोहोर उमटविण्यावर पंतप्रधान मोदींचे प्राधान्य असणार आहे. कोरोना महामारीमुळे ग्लोबल साउथला मोठा फटका बसला असून कोट्यावधी लोक पुन्हा दारिद्र्याच्या दरीत लोटले गेले आहेत.
आफ्रिकेवर लक्ष केंद्रीत
जी-20 संघटनेने विशेषकरून आफ्रिकेवर लक्ष केंद्रीत करावे अशी पंतप्रधान मोदींची इच्छा आहे. याचमुळे आफ्रिकेला जी-20 शिखर परिषदेचे स्थायी निमंत्रण दिले जावे अशी मागणी मोदींनी केली आहे. तर हवामान बदलाच्या आव्हानांसाठी विकसित देशांच्या वित्तीय प्रतिबद्धतांची अद्याप प्रतीक्षा आहे.









