काही काही लोकांना अफलातून जुगाड करण्याचा छंद असतो, याची सर्वांना कल्पना आहे. असे जुगाड करण्यातूनच मानवजातीने बैलगाडीपासून रॉकेटपर्यंत प्रगती केली आहे. माणसाच्या डोक्यात केव्हा, कशी आणि कोणती कल्पना चमकून जाईल, काही सांगता येत नाही. अमेरिकेच्या मिशिगन येथे राहणारे मायकेल सन हे असेच एक कल्पक गृहस्थ आहेत. सातत्याने काही ना कही नवनिर्मिती करीत राहणे, हा त्यांचा उद्योग आहे. त्यांनी रॉकेटवर चालणारा टॉयलेट, जेट पॉवर्ड कॉफी पॉट इत्यादी वस्तू निर्माण केल्या आहेत. आता त्यांनी पेट्रोलऐवजी बियरवर चालणारे एक इंजिन निर्माण केले आहे. ते स्वत: बियर पीत नाहीत. पण त्यांनी बियर आवडणारी (अर्थात, बियरवर चालणारी) दुचाकीही निर्माण केली आहे.
आपल्या घरगुती प्रयोगशाळेत त्यांनी बरेच परिश्रम करुन हे इंजिन तयार केले आहे. पेट्रोलच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने आणि बियरच्या किमती त्या मानाने स्थिर असल्याने त्यांनी बियरवर चालणारी बाईक साकारल्याचे स्पष्ट केले. ही बाईक चालविण्यास सोपी असून तिचा जास्तीत जास्त वेग 150 किलोमीटर प्रती तास असू शकतो असे त्यांचे प्रतिपादन आहे. मायकेल सन यांचा पुत्रही त्यांच्यासारखाच कल्पक आहे. त्यानेही अनेक आश्चर्यकारक वस्तू तयार केल्या आहेत. तथापि, बियरवर चालणारी बाईक ही वस्तू हा आपला सर्वात आवडता शोध असल्याचे ते म्हणतात. सर्वसामान्य लोक या बाईकचा उपयोग करु शकतील का, या प्रश्नावर, अद्याप या बाईकमध्ये त्या दृष्टीने काही सुधारणा केल्या पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचा प्रयोग अद्याप प्राथमिक अवस्थेत असून त्याचे आणखी फाईन ट्यूनिंग त्यांना करावयाचे आहे. ते झाल्यानंतर ही बाईक मार्गांवरुन धावू लागेल, असा विश्वास ते व्यक्त करतात.









