भरधाव कारने ठोकरल्याने घडला अपघात
बेळगाव : भरधाव कारने मोटारसायकलला ठोकरल्याने हिताची ऑपरेटर युवक जागीच ठार झाला. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अलारवाड ब्रिजनजीकच्या रुची ढाब्याजवळ रविवारी सकाळी ही घटना घडली असून अपघातानंतर कारचालकाने तेथून पलायन केले आहे. भीमशी सिद्धाप्पा गुडबली (वय 33) राहणार मास्तीहोळी, ता. बेळगाव असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. के. के. कोप्पजवळील एका स्टोनक्रशरमध्ये हिताची ऑपरेटर म्हणून तो काम करीत होता. रात्रपाळी संपवून सकाळी आपल्या मोटारसायकलवरून तो गावी जात होता. त्यावेळी भरधाव कारने ठोकरल्याने ही घटना घडली. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कारचालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून अपघातानंतर त्याने तेथून पलायन केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.









