आटपाडी :
दुचाकीने समोरून घोडागाडीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकजण आणि घोड्याचा मृत्यु झाला. ही घटना आटपाडी तालुक्यातील काळेवाडी–चिंचघाट येथे बाणुरगड रस्त्यावर घडली. अपघातातील मृताचे नाव भारत जयवंत मलमे (वय-51 रा. किडेबिसरी ता. सांगोला जि. सोलापूर) असे आहे.
सदरच्या अपघाताबाबत हनुमंत लक्ष्मण मलमे (रा. किडेबिसरी ता. सांगोला जि. सोलापूर) यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिल्याने किरण यशवंत मलमे (रा. किडेबिसरी ता. सांगोला) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आटपाडी तालुक्यातील काळेवाडी चिंचघाट येथे काळेवाडी ते बाणुरगड रस्त्याला मलमेवस्ती जवळ हा अपघात झाला.
किरण मलमे हा मोटरसायकलवर भारत जयवंत मलमे यांना बसवून काळेवाडी चिंचाघाट कडून बाणुरगडमार्गे किडेबिसरी गावाकडे निघाला होता. त्याचवेळी समोरून बाणुरगडकडून येणाऱ्या घोडागाडीला त्याच्या दुचाकीने जोराची धडक दिली. यात दुचाकीवर मागे बसलेले भारत मलमे यांचा मृत्यु झाला. तर ज्या घोडागाडीला धडक दिली त्या गाडीच्या घोड्याचाही मृत्यु झाला. यात घोडागाडी चालक जखमी झाला आहे. दुचाकीस्वार इसम आणि घोड्याच्या मृत्युच्या अजब अपघाताने किडेबिसरी गावावर शोककळा पसरली.








