ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जीव गमावला

प्रतिनिधी /फोंडा
फर्मागुडी – फोंडा येथे पाणीवाहू टँकरखाली सापडल्याने दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी 9 वा. सुमारास येथील आतिष हॉटेलसमोर फोंडा-पणजी महामार्गावर हा अपघात झाला. संदीप नारायण परबकर (38, रा. हाऊसिंगबोर्ड कॉलनी आमराय, कुर्टी) असे मयत तऊणाचे नाव आहे. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
मूळ कागल-कोल्हापूर येथील संदीप हा कुंडई येथील कॅडिला फार्मास्युटिकल्स कंपनीमध्ये नोकरीला होता. नोकरीनिमित्त गेल्या काही वर्षांपासून कुटुंबासह कुर्टी-फोंडा येथे त्याचे वास्तव्य होते. मंगळवारी सकाळी एमएच 09 डीसी 5629 या होंडा सीडी ट्रिगर मोटारसायकलवऊन तो कुंडई येथे कामावर जायला निघाला होता. फर्मागुडी येथील आतिष हॉटेलजवळ जीए 05 बी 7106 या व्हॅग्नर कारगाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना कारला निसटती धडक लागून तो दुचाकीसह रस्त्यावर कोसळला. याचवेळी समोऊन येणाऱ्या जीए 05 टी 5398 या पाणीवाहू टँकरखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.
मयत संदीप याच्या पश्चात पत्नी तसेच एक सहा व एक चार वर्षांचा असे दोन लहान मुलगे आहेत. पत्नी व मुले कुर्टी येथे त्याच्यासोबत वास्तव्यास असून आई वडील गावाकडे शेती करीत आहेत. आई वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याला एक बहीण असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. रसायनशास्त्र विषयात एमएसी पूर्ण केल्यानंतर गोव्यात त्याला नोकरी मिळाली होती. त्याच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबाचा कमावता आधार हरवला आहे.









