प्रतिनिधी / बेळगाव
आपल्या मुलीसह दुचाकीवरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या गळ्याला मांजा अडकल्याने तो जखमी झाल्याची घटना मंगळवारी कपिलेश्वर रेल्वेओव्हरब्रिजवर घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मांजाचा प्रश्न ऐरणीवर आला असून मांजा विक्री करणाऱ्यांवर व वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जनतेतून होत आहे.
सध्या शाळांना सुटी असल्यामुळे अनेक मुले पतंग उडविण्यामध्ये दंग आहेत. दुचाकीवरून वडील व मुलगी जात असताना मांजाचा दोरा त्यांच्या गळ्याला लागला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. तातडीने खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची सूचना करण्यात आली आहे. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
यापूर्वी मांजामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. मांजावर बंदी घालावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली. मात्र विक्रीवर बंदी पूर्णपणे झाली नसल्याने आता पुन्हा अशाप्रकारे जखमी होण्याच्या घटना वाढत आहेत. पालकांनीही आपल्या मुलांना याबाबत सूचना करावी, अशी मागणी होत आहे. मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर कपिलेश्वर पुलावर मोठा गोंधळ उडाला होता.









