प्रतिनिधी / फोंडा
फर्मागुडी-फोंडा येथील पीईएस महाविद्यालयाजवळ चार वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. प्रविण राठोड (27, कुर्टी-फोंडा) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. सदर अपघात काल बुधवारी सायं. 5.30 वा. सुमारास घडला.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयचर मालवाहू अवजड वाहन जीए 02 यू 6749 फोंडयाहून पणजीच्या दिशेने जात होते. पीईएस महाविद्यालयाजवळ पोचले असता वाहनाचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून निसटती धडक वाहनाच्या पुढे व रस्त्या ओलांडण्याच्या मार्गावर असलेल्या दोन दुचाकी व एका खासगी प्रवासी बसला बसली. त्यातील विनानंबरप्लेटसह असलेल्या दुचाकीचालक रस्त्यावर कोसळल्याने जखमी झाला. अन्य सर्वजण सुखरूप बचावले. फोंडा पोलिसानी घटनास्थळी पंचनामा केला. जखमीला फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले असून हवालदार देविदास पर्येकर अधिक तपास करीत आहे.









