
वार्ताहर /उचगाव
बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील बेळगुंदी फाटय़ानजीक (गणेश दूध संकलन केंद्र) कार व दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. तर कारचालकाने अती मद्यप्राशन केल्याने वाहनातून उतरण्याचीसुद्धा त्याला शुद्धी नव्हती.
सदर घटना बुधवार दि. 23 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. बेळगुंदी फाटय़ानजीक अजित सुतळे, रा. रामतीर्थनगर हा केए 03 एम, एफ 9533 कारमधून बेळगावच्या दिशेने भरधाव जात होता. तर बसुर्ते गावचा युवक दामाजी पुंडलिक मोरे हा बसुर्ते गावच्या दिशेने दुचाकीवरून जात होता. अजित मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याने त्याचा वाहनावर ताबा नसल्याचे समजते. समोरासमोर हा अपघात घडल्याने दामाजी मोरे यांच्या दुचाकीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला असून तोही गंभीर जखमी झाला आहे.
सदर अपघात रस्त्याच्या मधोमध झाल्याने आणि सायंकाळची वेळ असल्याने या मार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती. घटनास्थळी तातडीने पोलीस आल्यानंतर रस्त्यावरील कार बाजूला काढून वाहनांची गर्दी कमी करण्यात आली. कारचालक वाहनात बसूनच होता. रस्त्यातून बाहेर जातानासुद्धा तो वाहनातून खाली उतरला नाही. त्याला पोलिसांनी नाव, पत्ता, विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सांगण्याच्या परिस्थितीत नव्हता.
बेळगुंदी फाटय़ानजीक गतिरोधकाची गरज
बेळगुंदी फाटय़ानजीक गतिरोधक नसल्याने या मार्गावर भरधाव वाहनांची ये जा असते. या फाटय़ावरती गतिरोधक घालण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे. मात्र अद्याप या ठिकाणी गतिरोधक घातले नसल्याने अपघाताची मालिका अनेक वर्षांपासून सुरूच आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने उचगाव फाटा, कल्लेहोळ फाटा, बेळगुंदी फाटा, या सर्व फाटय़ांवरती तातडीने गतिरोधक घालावेत. अन्यथा असे अनेक अपघात घडून यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
काकती पोलीस स्थानकाच्या वरिष्ट अधिकाऱयांनी पंचनामा करून वाहने चौकशीसाठी ताब्यात घेतली आहेत. तर दामाजी मरुचे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.









