खाजगी भाडोत्री वाहन असल्याचा जखमीचा दावा
प्रतिनिधी /पणजी
खाजगी गाडय़ा पर्यटकांना भाडय़ाने दिल्यास थेट गाडी जप्त करण्यात येईल, असा इशारा खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिलेला असतानाही मोठय़ा प्रमाणात दुचाक्या आणि चारचाकी गाडय़ा भाडय़ाने देण्याचे प्रकार सुरूच असून त्यातून अपघातांच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे.
बुधवारी पणजीत 18 जून मार्गावर झालेल्या अशाच एका अपघातात एका कारने दुचाकी चिरडल्याने चालक गंभीर जखमी झाला. त्यामुळे राजधानीतील वाहतूक सुमारे दोन तास विस्कळीत झाली. जीए 03 व्हाय 9109 ही खाजगी कार 18 जून मार्गावरून चर्च चौकाच्या दिशेने जात असताना मनपा जवळील चार रस्त्यांवर तिने जीए 07 एए 1370 या दुचाकीला ठोकर दिली. त्यात दुचाकी चालक आगा हा गंभीर जखमी झाला. या कारने तेथे पार्क केलेल्या अन्य अनेक दुचाकींनाही धडक दिल्याने त्यांचेही नुकसान झाले.
जखमी दुचाकी चालकास जवळच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी येऊन पंचनामा केला. परंतु दुचाकी चालक, सदर पर्यटक नशेत होता असा दावा करत अपघातास्थळीच त्याची अल्कोहोल तपासणी करण्याचा हट्ट धरून बसला. त्यामुळे पोलिसांना वाहने बाजूला काढणे शक्य झाले नाही. त्यातून संपूर्ण मार्गावर वाहनांची मोठी रांग लागली. शेवटी अल्कोहोल मीटरद्वारे त्याची तपासणी करण्यात आली व नंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आली. या मार्गावर दोन्ही बाजूनी दुचाकी-चारचाकी वाहने पार्क करण्यात येत असल्याने केवळ एकच वाहन चालू शकेल एवढाच रस्ता शिल्लक राहतो. अपघातामुळे या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला.
दरम्यान, सदर अपघातग्रस्त खाजगी कार पर्यटकांना भाडय़ाने देण्यात आली होती, असा दावा जखमी दुचाकीचालकाने पत्रकारांशी बोलताना केला. त्यामुळे सदर कारच्या मालकाने अपघातस्थळी यावे, अशी मागणी आपण केली. परंतु त्या मालकाने नकार दिला, अशी माहितीही त्यांनी दिली.









