चिपळूण :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कापसाळ-दुकानखोरी येथे गुरुवारी रात्री 12.30 वाजता उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात टेरव येथील तरुण ठार झाला. या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या तरुणावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सिद्धेश दिलीप गोवळकर (22, टेरव-तांबडवाडी) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. या बाबतची खबर ट्रकचालक बसप्पा भिपाप्पा पुदरीमणी (चिंपककत्ती-बेळगाव) यांनी दिली. ते ट्रक कापसाळ-दुकानखोरी येथे रस्त्याच्या कडेला उभा करून झोपले होते. रात्री 12.30 वाजता पाठीमागे काहीतरी आपटल्याचा आवाज झाल्याने ते जागे झाले. यावेळी सिद्धेश याची दुचाकी आदळल्याचे त्यांच्या लक्षात आले. या अपघातात सिद्धेशचा मृत्यू झाला. याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.
- मित्राचा वाढदिवस करून जात होता घरी
सिद्धेश हाही टेम्पो चालवण्याचे काम करायचा. गुरुवारी त्याच्या मित्राचा वाढदिवस असल्याने तो शहराकडे आला होता. हा कार्यक्रम झाल्यानंतर तो घरी जात असताना हा अपघात झाला. त्यामुळे मित्राच्या वाढदिवसाचा कार्यक्रम त्याच्या आयुष्यातील शेवटचा ठरला.
- तीन बहिणींचा एकच भाऊ
सिद्धेश याचे वडील मोलमजुरी करतात. तर आई अंगणवाडीवर मदतनीस म्हणून काम करते. सिद्धेश याच्या तीन बहिणींचा विवाह झाले आहेत. या तीन बहिणींचा सिद्धेश हा एकच भाऊ होता. त्यामुळे त्याच्या अपघाती निधनाने गोवळकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्यावर टेरव येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.








