विविध सोयी सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी दिले मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन
वार्ताहर /किणये
बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप या तीन गावची जागृत महालक्ष्मी देवी यात्रा तब्बल तीस वर्षानंतर भरविण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या तिन्ही गावच्या नागरिकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या यात्रेचा धार्मिक विधीही पार पडला आहे. यात्रा काळात विविध प्रकारच्या सोयी-सुविधा पुरविण्याची मागणी ग्रामस्थांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे केली आहे. 16 एप्रिलपासून बिजगर्णी गावात यात्रा भरविण्यात येणार आहे. बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप या तीन गावची यात्रा असल्यामुळे यात्रेसंदर्भात यापूर्वी नागरिकांच्या दोन बैठक्या झालेल्या आहेत.
विकासकामांसाठी पाच कोटी मंजूर
आमदार फंडातून पाच कोटी रुपये मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंजूर केलेले आहेत. सध्या त्याचे कामकाज सुरू आहे. यामध्ये काँक्रीटचे रस्ते, गटारी व सीडी वर्क करण्यात येणार असल्याची माहिती नामदेव मोरे यांनी दिली.
यात्रा काळात सहकार्याचे आश्वासन
यात्राकाळामध्ये पाण्याची व्यवस्था, जादा बस सोडणे, सुरळीत विद्युत पुरवठा तसेच पोलीस बंदोबस्त करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे तीन गावातील नागरिकांनी दिले. त्यांच्या या निवेदनाचा स्वीकार करून आपण यात्रेसाठी पूर्णपणे सहकार्य करू, असे आश्वासन हेब्बाळकर यांनी दिले. तसेच आपण स्वत:हून यात्रा काळामध्ये चार टँकरमधून पाणीपुरवठा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थ, पंच कमिटीचे अध्यक्ष वसंत अष्टेकर, ग्रा. पं. अध्यक्ष मनोहर बेळगावकर, यल्लाप्पा बेळगावकर, परशुराम भास्कर, चांगदेव जाधव, ज्योतिबा मोरे, नारायण भास्कर, अब्दुल नागवेकर, मारुती जाधव, रघुनाथ मोरे, पुंडलिक कोळी आदींसह तिन्ही गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









