तब्बल 28 वर्षांनंतर होणार यात्रा : धार्मिक विधी-गाऱ्हाणा कार्यक्रम
वार्ताहर /किणये
बिजगर्णी गावातील जागृत महालक्ष्मी देवीची यात्रा एप्रिल ते मे 2024 मध्ये करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे. यात्रा भरवण्याच्या निमित्ताने सोमवारी गावात दिवसभर कडक वार पाळणूक करून देवतांना गाऱ्हाणा व पूजा विधी कार्यक्रम करण्यात आला. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिजगर्णी गावात तब्बल 28 वर्षानंतर महालक्ष्मी देवीची यात्रा होणार असल्यामुळे गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.सोमवारी सकाळी उपस्थित गावातील पंचमंडळी, पुजारी व ग्रामस्थांच्या वतीने महालक्ष्मी देवीची पूजा करण्यात आली. त्यानंतर गावातील सर्व देवतांची पूजा करण्यात आली. महालक्ष्मी देवीच्या यात्रेसाठी लागणारा रथ बनविण्यासाठी लाकूड व शस्त्रपूजन यावेळी करण्यात आले. यात्रा नेमकी किती दिवस भरवायची याबद्दल पुढील बैठकीत ठरविण्यात येणार आहे. यात्रा करण्याचा संकल्प सोमवारी ग्रामस्थांनी केला. तब्बल 28 वर्षानंतर सदर यात्रा होणार असून सोमवारी गावातील सर्व देवांना गाऱ्हाणे कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. दिवसभर भागातील भक्तांनी महालक्ष्मी देवीच्या मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतला.