पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, राजदवर घणाघात
वृत्तसंस्था/ औरंगाबाद (बिहार)
बिहारच्या जनतेचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कामगिरीवर विश्वास आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा आमचेच सरकार सत्तेवर येत आहे. येथील मतदारांनी विरोधी पक्षांचा खोटारडेपणा झिडकारला असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विकास कार्यक्रमांनाच आपला कौल देण्याचा निर्धार केला आहे. याचे प्रत्यंतर 14 नोव्हेंबरला होणाऱ्या मतगणनेतून येणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या औरंगाबाद येथील निवडणूक प्रचार सभेत शुक्रवारी केले आहे.
बिहारमध्ये मतदानाचा प्रथम टप्पा गुरुवारी पार पडला आहे. या टप्प्यातील 121 मतदारसंघांमध्ये मतदानात मोठी वाढ दिसून आली आहे. हा सत्ताधारी पक्षाला लोकांनी दिलेला आशीर्वाद असून या प्रथम टप्प्यातच आमचा विजय सुनिश्चित झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्याचे मतदान येत्या मंगळवारी होणार असून ते पूर्ण झाल्यानंतर आमच्या विजयावर मतदारांची मुद्रा उमटणार आहे. विरोधकांचा नकारात्मक कार्यक्रम लोकांनी नाकारला असून आमच्या विकासाधारित धोरणांना मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे, अशीही मांडणी त्यांनी केली.
आमची कामगिरी सर्वांसमोर
आमची कामगिरी सर्व मतदारांसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचे कार्य मतदारांना माहीत आहे. या कार्यावरच ते विश्वास ठेवत असून स्वप्नांच्या मागे धावणार नाहीत. विरोधी पक्षांनी या निवडणुकीत दिलेली वारेमाप आश्वासने पूर्ण होणे शक्य नाही, हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे आमच्या कार्यकाळात त्यांचा जो विकास झाला, त्यालाच ते पुन्हा कौल देतील, हे नि:संयश आहे. त्यामुळे निर्णय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी सभेत व्यक्त केला.
जंगलराजची समाप्ती
बिहारमध्ये आमच्या जवळपास साडेअठरा वर्षांच्या सत्ताकाळात आम्ही जंगलराजची समाप्ती यशस्वीरित्या केली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अत्यंत कुशलतेने भ्रष्टाचारमुक्त प्रशासन दिले. यामुळे बिहारचा विकासदर मोठ्या प्रमाणात वाढला. आता आम्हाला राज्याचा आणखी विकास करायचा आहे. त्यासाठी आमच्या सरकारला लोक पुन्हा संधी देतील. ज्यांनी या राज्याला जंगलराजची देणगी दिली, त्यांच्यावर पुन्हा घरी बसण्याची वेळ येणार हे निश्चित आहे. विकासाचा वेग वाढण्यासाठी आणि विकास स्थिरावण्यासाठी आमचे सरकार पुन्हा निवडून देण्याचा निर्धार लोकांनी केल्याचे स्पष्ट आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
द्वितीय टप्प्याचा प्रचार शिगेला
बिहारमधील 18 जिल्ह्यांमधील 121 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विक्रमी 64.66 टक्के मतदान झाले असून हा बिहारमधला 1951 च्या प्रथम निवडणुपासूनचा विक्रम आहे. आता द्वितीय टप्प्याचे मतदान येत्या मंगळवारी, अर्थात, 11 नोव्हेंबरला होणार आहे. या टप्प्यात 122 मतदारसंघांमध्ये मतदान होईल. त्यानंतर येत्या शुक्रवारी, अर्थात, 14 नोव्हेंबरला सर्व मतदारसंघांमधील मतगणना होणार आहे. त्याच दिवशी रात्रीपर्यंत निर्णय हाती येऊन नव्या सरकारच्या स्थापनेच्या हालचालींना प्रारंभ होईल. या निवडणुकीत मुख्य चुरस सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महागठबंधन यांच्यात आहे. द्वितीय टप्प्यातील निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जीव तोडून प्रयत्न चालविले असून सर्व पक्षांचे महत्वाचे प्रचारक जोरदार कष्ट करताना दिसून येत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर अनेक नेत्यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर महागठबंधनच्या वतीने तेजस्वी यादव, प्रियांका गांधी आदी नेते संघर्षात आहेत. येत्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता जाहीर प्रचार संपणार असून त्यानंतर मतदान आणि मतगणना यांची प्रतीक्षा सर्व पक्ष आणि कार्यकर्त्यांकडून केली जाणार आहे.









