बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या एका दुःखद घटनेत बागमती नदीत एक बोट उलटली. या दुर्दैवी घटनेत किमान 10 मुले बेपत्ता असल्याची बातमी समोर येत आहे. एकूण 30 मुले असलेल्या बोटीमधील 20 मुलांना वाचवण्यात यश आले आहे. सर्व मुले ही बोटीमधून शाळेला जात होती.
बिहारमधील बागमती नदीकाठी असणाऱ्या मधुपूरपट्टी घाटाजवळ ही दुर्दैवी घटना घडली. बिहारचे मुख्यमंत्री, नितीश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना परिस्थिती सांगून बचाव कार्य युद्धपातऴीवर सुरू असल्याचे सांगितले आहे. तसेच या प्रकरणासंबंधित ज्या गोष्टींची अंमलबजावणी करता येईल ती ती करण्याची निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच नितीशकुमार यांनी राज्य सरकार पीडित कुटुंबांना आवश्यक ती सर्व मदत करण्य़ाचेही आश्वासन दिले आहे.