दुभाजकाला धडकल्यावर रिक्षाला टक्कर ः 7 जण जखमी
वृत्तसंस्था / हाजीपूर
बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या ताफ्यातील एक वाहन वैशाली जिल्हय़ातील भगवानपूर येथे दुर्घटनाग्रस्त झाले आहे. राज्यपाल आर्लेकर हे पाटण्याहून मुजफ्फरपूर येथे जात असताना ही दुर्घटना घडली आहे. राज्यपालांच्या ताफ्यात सामील अग्निशमन दलाचे वाहन दुभाजकाला धडकून उलटले, मग एका रिक्षाला या वाहनाची टक्कर बसली आहे.
या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे तीन जवान आणि रिक्षातून प्रवास करणारे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर स्थानिक लोकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनांमधून जखमींना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना उपचारासाठी हाजीपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. राज्यपालांच्या ताफ्यातील वाहन दुर्घटनाग्रस्त झाल्याने घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे. दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाचे दुसरे वाहन मागविण्यात आले.









