बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. प्रशासकीय सेवांच्या नियंत्रणावरून केंद्राशी सुरू असलेल्या आप सरकारच्या संघर्षात बिहारच्या मुख्यमंत्र्यानं पाठींबा दिला आहे. नितीश कुमार यांच्याबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादवही होते.
IAS आणि तसेच इतर संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय राजधानी तसेच नागरी सेवा प्राधिकरण तयार करण्याचे अध्यादेश जारी केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पोलीस, सार्वजनिक सुव्यवस्था आणि जमीन यांच्याशी संबंधित सेवा वगळून इतर सेवांचे नियंत्रण निवडून आलेल्या दिल्ली सरकारकडे सोपवल्यानंतर काही दिवसांनी हि भेट घडून आली.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, “मी नितीश कुमारजी यांना या संदर्भात सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी बोलण्याची विनंती केली आहे. कोणताही आध्यादेश सहा महिन्यांत मंजूर करावा लागतो. जर हे विधेयक राज्यसभेत पराभूत झाले तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा सपशेल पराभव होणार असा संदेश जाईल. हा 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल असेल.” असेही आपचे राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकारांना म्हणाले.
त्यांनंतर बोलताना नितीशकुमार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही केंद्राने अध्यादेश जारी केल्याबद्दल मुख्यमंत्री कुमार यांनी टीका केली. “लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारची सत्ता तुम्ही कशी काढून घेऊ शकता. संविधान पहा आणि काय बरोबर आहे ते पहा. केजरीवाल जे काही बोलत आहेत ते बरोबर आहे. आम्ही पूर्णपणे त्यांच्यासोबत आहोत,” असा सवाल जनता दल (युनायटेड)च्या अध्यक्षांनी केला.