पाच तस्करांना 20 मिली विषासह अटक
वृत्तसंस्था/ नोएडा
बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या यूट्यूबर एल्विश यादववर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. विषारी सापांची तस्करी आणि बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या आयोजित केल्याच्या आरोपाखाली नोएडातील सेक्टर 49 पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप खासदार मनेका गांधी यांच्या पीपल फॉर अॅनिमल्स या संस्थेत काम करणाऱ्या गौरव गुप्ता यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
एल्विश यादव नोएडा आणि एनसीआरच्या फार्म हाऊसमध्ये जिवंत सापांसह व्हिडीओ शूट करतो. याशिवाय रेव्ह पार्ट्यांमध्येही सापाच्या विषाचा वापर केला जातो, असा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी राहुल, टिटूनाथ, जयकरण, नारायण आणि रविनाथ अशा पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 9 विषारी साप आणि 20 मिमीचे विष जप्त करण्यात आले आहे. यामध्ये पाच कोब्रा, एक अजगर, दोन दुतोंडी साप आणि एका उंदीर सापाचा समावेश आहे. याप्रकरणी एल्विश यादवसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आता नोएडा पोलीस एल्विश यादवचा शोध घेत आहेत.
पीपल फॉर अॅनिमल्स या स्वयंसेवी संस्थेत कल्याण अधिकारी म्हणून काम करणाऱ्या गौरव गुप्ता यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार, एल्विश यादव त्याच्या साथीदारांसह नोएडा आणि एनसीआरमधील फार्म हाऊसवर बेकायदेशीरपणे रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करत असल्याची माहिती मिळाली होती. या पार्ट्यांमध्ये परदेशी तरुणींना नियमित बोलावले जाते आणि त्या तरुणी सापाचे विष आणि इतर मादक पदार्थांचे सेवन करतात. या माहितीवरून आमच्या एका माहितीदाराने एल्विश यादवशी संपर्क साधला आणि त्याला नोएडामध्ये रेव्ह पार्टी आयोजित करण्यास आणि कोब्रा वेनमची व्यवस्था करण्यास सांगितले. एल्विशने त्याच्या एजंट राहुलचा फोन नंबर माहिती देणाऱ्याला दिला आणि त्याला नाव सांगा, तो सर्व व्यवस्था करेल असे सांगितले.
तक्रारीनुसार, माहिती देणाऱ्याने राहुलशी एल्विशच्या नावाने बोलताच त्याने रेव्ह पार्टी आणि इतर व्यवस्था आयोजित करण्यास होकार दिला. माहिती देणाऱ्याने त्याला नोएडाच्या सेक्टर 51 मध्ये असलेल्या बँक्वेट हॉलमध्ये बोलावले आणि डीएफओ नोएडा आणि पोलिसांना याची माहिती दिली. राहुल आदी तेथे पोहोचले. त्याने सोबत 9 साप आणि सापाचे विष आणले होते. दरम्यान, पोलिसांनी तेथे पोहोचून सर्वांना ताब्यात घेतले. पोलिसांनी एल्विश यादवसह सहा आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे.









