सामनावीर मार्करमचे नाबाद शतक, डी कॉक-बवुमा यांची अर्धशतके, वॉर्नरची खेळी वाया
वृत्तसंस्था/ पोश्चेफस्ट्रूम, द.आफ्रिका
सामनावीर एडन मार्करमचे शतक, क्विन्टॉन डी कॉक व कर्णधार टेम्बा बवुमा यांची अर्धशतके आणि गेराल्ड कोएत्झीची भेदक गोलंदाजी यांच्या आधारावर दक्षिण आफ्रिकेने येथे झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियावर 111 धावांनी दणदणीत विजय मिळवित मालिकेतील आव्हान राखले. पाच सामन्यांच्या मालिकेत आता ऑस्ट्रेलिया 2-1 असे आघाडीवर आहे.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर दक्षिण आफ्रिकेला मार्करम (नाबाद 102), डी कॉक (80) व बवुमा (57) यांनी इतरांच्या साथीने निर्धारित 50 षटकांत 6 बाद 338 धावांची मजल मारून दिली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 19 व्या षटकापर्यंत 2 बाद 157 धावा जमवित आव्हान गाठण्याच्या दिशेने आगेकूच केली होती. पण जलद अर्धशतक नोंदवणारा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर 78 धावांवर धावचीत झाल्यानंतर कोएत्झीच्या भेदक माऱ्यापुढे त्यांच्या डावाला गळती लागली आणि ठरावीक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले. 34.3 षटकांत ऑस्ट्रेलियाचा डाव 227 धावांत गुंडाळून द.आफ्रिकेने दणदणीत विजय साकार केला. पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. या दोन संघातील चौथा सामना शुक्रवारी जोहान्सबर्गमध्ये होणार आहे.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात लेगस्पिनर तन्वीर सांघाला वनडे पदार्पणाची संधी दिली. याच दौऱ्यात त्याने टी-20 मध्येही पदार्पण केले होते आणि त्याने 31 धावांत 4 बळी टिपले होते. मात्र येथे डी कॉक व बवुमा यांनी मोठी भागीदारी केल्यानंतर त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. पॉवरप्लेमध्ये या जोडीने 65 धावांची भागीदारी केली होती. 23 व्या षटकांत टॅव्हिस हेडने डी कॉकला बाद करून ही जोडी फोडली. दोघांनी 146 धावांची सलामी दिली. त्याने 77 चेंडूत 10 चौकार, 2 षटकारांसह 82 धावा जमविल्या. पुढच्याच षटकात बवुमाला सांघाने 57 धावांवर बाद करीत पहिला बळी मिळविला. बवुमाने 62 चेंडूत 6 चौकार मारले.
मार्करमचे अखेरच्या चेंडूवर शतक

या पडझडीने विचलित न होता मार्करमने हेन्ड्रिक्सच्या साथीने 12 षटकांत 76 धावांची व नंतर मार्को जान्सेनसमवेत अखेरच्या टप्प्यात 5 षटकांत 63 धावांची भर घातली. हॅझलवुडने टाकलेल्या 45 व्या षटकात त्यांनी 23 धावा फटकावल्या. डावातील शेवटच्या चेंडूवर मार्करमने हॅझलवुडला चौकार ठोकत दुसरे वनडे शतक पूर्ण केले. 74 चेंडूंच्या खेळीत तो 9 चौकार, 4 षटकार ठोकत 102 धावांवर नाबाद राहिला. हेडने दोन बळी मिळविल्यामुळे द.आफ्रिकन खुश झाले होते. कारण तबरेझ शम्सी व केशव महाराज यांच्या रूपात त्यांच्याकडे दोन स्पिनर्स होते.
मात्र ऑस्ट्रेलियाने सुरुवात केली तेव्हा या दोन स्पिनर्सचा फारसा प्रभाव पडला नाही. वॉर्नर व हेड यांनी आक्रमक फटकेबाजी करीत 7.5 षटकांत 79 धावांची तर पॉवरप्लेअखेर 1 बाद 104 धावांची मजल मारली होती. सिसांदा मगालाने हेडला 38 धावांवर बाद पेले. त्याने 24 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार मारला. वॉर्नरला पहिल्याच षटकात जीवदान मिळाले होते, त्याचा त्याने पुरेपूर लाभ घेत 78 धावांची आक्रमक खेळी केली. त्याने 27 चेंडूत अर्धशतकी मजल मारली होती. 19 व्या षटकात एकेरी धाव घेताना वॉर्नर घसरला. त्याचा बूट निघाला, तरीही त्याने धाव घेतली. पण केशव महाराजच्या थेट फेकीवर तो धावचीत झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि कोएत्झीने केशव महाराज व शम्सी यांच्या साथीने त्यांचा डाव 227 धावांवर गुंडाळला. कोएत्झीने शेवटचे पाचपैकी चार बळी मिळविले. शम्सी व महाराज यांनी प्रत्येकी 2 बळी टिपत विजयात मोलाची भूमिका बजावली.
संक्षिप्त धावफलक : द.आफ्रिका 50 षटकांत 6 बाद 338 : डी कॉक 77 चेंडूत 82, बवुमा 62 चेंडूत 57, हेन्ड्रिक्स 45 चेंडूत 39, मार्करम 74 चेंडूत नाबाद 102, मार्को जान्सेन 16 चेंडूत 32, अवांतर 12. गोलंदाजी : हेड 2-39, स्टोइनिस 1-58, एलिस 1-69, सांघा 1-64. ऑस्ट्रेलिया 34.3 षटकांत सर्व बाद 227 : वॉर्नर 56 चेंडूत 78, हेड 24 चेंडूत 38, मार्श 26 चेंडूत 29, लाबुशेन 15, कॅरे 12, स्टोइनिस 10, एलिस 16, हॅझलवुड नाबाद 12. गोलंदाजी : कोएत्झी 4-50, शम्सी 2-29, केशव महाराज 2-37.









