सराफ शील्ड क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : द बेळगाव क्रिकेट क्लब आयोजित सराफ शील्ड 15 वर्षांखालील आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत ठळकवाडी संघाने ज्योती सेंट्रल संघाचा 73 धावांनी पराभव करुन पुढील फेरीत प्रवेश केला. प्रज्योत उघाडे याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. एसकेई प्लॅटिनम ज्युबिली मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात ठळकवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी बाद 163 धावा केल्या. त्यात प्रज्योत उघाडेने 14 चौकारांसह 77 तर विराज बी.ने 3 चौकारांसह 27 धावा केल्या. ज्योतीतर्फे श्रीशैल यादवने 21 धावांत 3 तर सिद्धार्थने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ज्योती सेंट्रल स्कूलचा डाव 14.5 षटकात सर्वगडी बाद 90 धावांत आटोपला. त्यात सिद्धार्थ अधिकारीने 6 चौकारांसह 42, विवेक यादवने 3 चौकारांसह 13 धावा केल्या. ठळकवाडीतर्फे साईनाथ पाखरेने 12 धावांत 2, ज्ञानेश्वर एम.ने 18 धावांत 2 तर मयुर व प्रज्योत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.









