बेळगांव – आज विधानसभेच्या तिसर्या दिवसाच्या कामकाजात पुरेशी बससेवा देण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. सुवर्णसौध येथे झालेल्या विधानसभेच्या तिसऱ्या दिवशी तेरदाळचे भाजप आ. सिद्धू सावदी यांनी पुरेशी बस सुविधा नसल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याचा प्रश्न उपस्थित केला. ग्रामीण स्तरावर मोठी बससेवा देता येत नसेल, तर मिनी बस सुविधा देण्याची मागणी केली. यावर परिवहन मंत्री श्रीरामुलू म्हणाले की, तेरदाळमध्ये ४८३ बस फेऱ्या केल्या जात आहेत. शाळा-कॉलेजच्या मुलांना बससेवा दिली जाईल. कुठे पुरेशी सेवा दिली जात नाही याची माहिती देऊन सुविधा देण्याचा विश्वास व्यक्त केला. आर.व्ही.देशपांडे म्हणाले की, मूलभूत सुविधांशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. बस कंडक्टर ड्रायव्हर देणे आवश्यक असल्याचे सांगितले. यानंतर बिदरचे आ. बंडप्पा कशमपूर आदी विरोधी आमदारांनीही आपल्या भागातील बससेवेचा प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. यावर परिवहन मंत्री श्रीरामुलू म्हणाले की, अधिवेशन संपण्यापूर्वीच संबंधित विभागाच्या आमदारांची बैठक बोलावून हा प्रश्न सोडवला जाईल. नवनियुक्त 2000 चालकांना 10 ऐवजी 20 हजार मासिक वेतन देण्यात येईल असे म्हणाले. मात्र यावर नाराज होऊन विरोधी पक्षनेत्यांनी सभापतींसमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. काँग्रेसचे आमदार रंगनाथ सभापती यांना या विषयावर बोलू न दिल्याने त्यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी मंत्री गोविंद करजोळ यांनी आ. रंगनाथ यांना तेथून बाहेर काढण्याची सूचना केली. दरम्यान, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी सभापतींना घेरले आणि विरोधी आमदारांचा अनादर केल्याचा आरोप केला. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादावादी झाली. सभागृहात गदारोळ झाल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.
10 मिनिटांनंतर अधिवेशन पुन्हा सुरु झाला . कायदा मंत्री मधुस्वामी यांना यावेळी सांगितले कि परिवहन मंत्री श्रीरामुलू यांचे उत्तर मिळाले आहे. यादरम्यान कार्यवाही पुठे चालवण्याची विनंती केली. मात्र यावर असमाधानी असलेल्या विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी काँग्रेस नेत्यांना दिलेल्या वागणुकीबद्दल खेद व्यक्त करण्याची मागणी केली. त्याचवेळी मंत्री गोविंद कारजोळ आणि अध्यक्षांवरही निशाणा साधला. कायदामंत्री माधुस्वामी यांनी पुन्हा उत्तर देण्यास सुरुवात केली, त्यानंतर खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला असता, मंत्री मधुस्वामी यांनी त्यांना कडक शब्दात उत्तर देण्यास नकार दिला. त्यामुळे विरोधी पक्षनेते आणखीनच नाराज झाले. पुन्हा गोंधळ सुरू झाला.









