सोने चांदी, वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तुंची खरेदी
प्रतिनिधी / बेळगाव
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. पाडव्यानिमित्त नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. त्यामुळे बाजारपेठेत बुधवारी नागरिकांची वर्दळ वाढली होती. इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने, चांदी, वाहने आदींची खरेदी अधिक झाली. त्यामुळे शोरूम आणि दुकानांमध्येदेखील नागरिकांची गर्दी वाढली होती.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर विविध नवीन वस्तुंची खरेदी केली जाते. घर खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवे उपक्रम, सोने-चांदीची खरेदी, वाहने यासह इतर नवीन वस्तू खरेदीलादेखील पसंती दिली जाते. त्यामुळे बुधवारी बाजारपेठेत नवीन वस्तू खरेदीची रेलचेल पाहायला मिळाली. पाडव्यानिमित्त टीव्ही, फ्रीज, मोबाईल यासह इतर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तुंची खरेदी झाली तर काहींनी दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनेदेखील खरेदी केली. त्यामुळे वाहनांच्या शोरूममध्ये खरेदीदारांची गर्दी वाढली होती.
गुढीपाडव्याच्या सणासाठी मागील दोन दिवसांपासून बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली होती. त्यामुळे शहरातील सराफ, वाहन, आणि कपडे बाजारदेखील नागरिकांनी फुलून गेला होता. सोने-चांदीबरोबरच हार, बांगड्या, नथ, अंगठ्या आणि नक्षीकाम असणाऱ्या दागिन्यांना मागणी वाढली होती. सोन्याचा भाव वाढल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली.
मोबाईल खरेदी
अलीकडे मोबाईल वापरणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर युवक-युवतींनी मोबाईल खरेदीला पसंती दिली. पाडव्यानिमित्त खरेदी केलेल्या नवीन वस्तुंची काहींनी सोशल मीडियावर हवा केली. त्यामुळे अभिनंदनाच्या संदेशाची देवाण-घेवाण सुरू होती. या मुहूर्तावर काहींनी नवीन घर तर काहींनी प्लॉटचे व्यवहारदेखील केले. त्यामुळे प्लॉट खरेदी-विक्री आणि घर खरेदीच्या व्यवहारातूनही मोठी उलाढाल झाली.









