सिरसा येथीलखासदार अन् दलित नेत्या कुमारी शैलजा नाराज : भाजपने प्रचारात लावून धरला मुद्दा
वृत्तसंस्था/ चंदीगड
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी जारी जोरदार प्रचारादरम्यान काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे. काँग्रेस खासदार कुमारी शैलजा या पक्षात नाराज झाल्या आहेत. तिकिटवाटपात माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हु•ा गटाला अधिक महत्त्व देण्यात आल्याने त्या नाराज आहेत. कुमारी शैलजा मागील 1 आठवड्यापासून प्रचारात दिसून आलेल्या नाहीत.
प्रचारापासून शैलजा यांना राखलेल्या अंतरामुळे काँग्रेसचे नेते चिंता व्यक्त करत आहेत. एकीकडे भूपेंद्र सिंह हु•ा आणि रोहतकचे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा हे प्रचारात सामील झाले आहेत. तर शैलजा या प्रचारात उतरलेल्या नाहीत. यामुळे पक्षाला राज्यभरात फटका बसू शकतो असे मानले जात आहे.
प्रचारादरम्यान सिरसा येथील खासदार कुमारी शैलजा न दिसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हरियाणाच्या 90 जागांपैकी 89 जागांवर काँग्रेसने उमेदवार उभे केले आहेत. तर हुड्डायांनी यातील 72 मतदारसंघांमध्ये स्वत:च्या समर्थकांना उमेदवारी मिळवून दिल्याचे मानले जाते. तर कुमारी शैलजा यांच्या सुचनेनुसार केवळ 10 मतदारसंघांमध्ये उमेदवार ठरविण्यात आले आहेत. तिकिटवाटपापूर्वी कुमारी शैलजा या पक्षासाठी सातत्याने प्रचारसभा घेत होत्या आणि त्यांनी यात्राही काढली होती. परंतु उमेदवार जाहीर करण्यात आल्यावर मात्र त्यांनी प्रचारातून अंग काढून घेतले आहे.
भाजपकडून काँग्रेस लक्ष्य
कुमारी शैलजा यांच्या नाराजीला भाजपने मोठा मुद्दा केले आहे. काँग्रेस दलितांचे कल्याण इच्छित नसल्याचा आरोप भाजपने केला. हुड्डा परिवार आजवर एका दलित कन्या कुमारी शैलजा यांचा सन्मान करू शकला नाही, तर राज्यातील उर्वरित दलितांसाठी हुड्डा काय करतील असा प्रश्न भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी मायावती यांचे भाचे आकाश आनंद यांनीही कुमारी शैलजा यांच्या अपमानाचा मुद्दा उपस्थित करत त्यांना बसपमध्ये सामील होण्याचे निमंत्रण दिले होते.
काँग्रेसमध्ये गटबाजी
हरियाणातील काँग्रेसमध्ये तीन गट असल्याचे मानले जाते. यातील एक गट भूपेंद्र सिंह हुड्डा, दुसरा गट कुमारी शैलजा आणि तिसरा गट रणदीप सुरजेवाला यांचा आहे. तर काँग्रेस कुठल्याही प्रकारची गटबाजी नसल्याचा दावा करत आहे. परंतु पक्षातील ही गटबाजी वारंवार उफाळून येत आहे. निवडणुकीच्या काळात या गटबाजीला ऊतच आला आहे. तिकिटवाटपात हुड्डा आणि प्रदेशाध्यक्ष उदयभान यांची मोठी भूमिका राहिली होती. तर शैलजा यांनी स्वत:च्या समर्थक नेत्यांना उमेदवारी मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. यातील हिसार, फतेहाबाद आणि अंबाला जिल्ह्यातील 10-11 जागांवर त्यांनी स्वत:च्या समर्थकांना उमेदवारी मिळवून दिल्याचे मानले जाते.









