सुधीर खरटमल यांनी घेतला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
सोलापूर : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पदाचा राजीनामा देत गुरुवारी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासाठी धक्कादायक मानली जात आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांमधून भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे. यावरून भाजपमध्ये मोठी नाराजी, तीव्र विरोध सुरू असताना दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात काही आलबेल नाही, असे दिसून येते. या पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून अध्यन विरुद्ध पदाधिकारी असा वाद सुरू झाला होता. या पार्श्वभूमीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला शहराध्यक्ष सुधार सुधीर खरटमल यांनी दांडी मारली होती. त्यांनी आपल्या ऐवजी एका कार्यकर्त्याला पाठवल्याने त्यावरून वादंग उठले होते. यानंतर पक्षातील काही स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी सोमवारी शरद पवार यांची बारामती येथे भेट घेऊन खरटमल यांच्याबाबत तक्रार केली होती.
हा वाद पेटणार अशी चिन्हे दिसताच शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी शहराध्यक्ष व सदस्यत्वाचा राजीनामा देत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत खरटमल यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शेला घालून स्वागत केले. ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, मंत्री दत्तामामा भरणे, रूपाली चाकणकर, संजयमामा शिंदे, संतोष पवार, आनंद चंदनशिवे, किसन जाधव आदी उपस्थित होते.








