दुनिया झुकती है मगर झुकानेवाला चाहिये’ ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. अर्थात दुनियेस झुकवण्यामागचा हेतू शुद्ध असला आणि तंत्र वैध असले तरी अशी कृती ‘कर्तृत्व’ या सदरात गणली जाते. याउलट या मागचे तंत्र अवैध आणि हेतू फसवणुकीचा असेल तर अशा व्यक्तीस अपकृत्यास साजेशी सजा भोगावी लागते. आधुनिक जगात आरोग्यविषयक संशोधनात नित्य नवे बद होत आहेत. नवनवे शोध लागत आहेत. एक झपाट्याने बदलत जाणारे क्षेत्र म्हणून या क्षेत्राचा उल्लेख होतो. हे बदल होताना काही अनिष्ट प्रवृत्तीही या क्षेत्रात वावरताना दिसतात. विशेषत: कोरोना काळात सेवाभावी आरोग्य सेवेचे, संशोधनांचे दर्शन जसे जगभरात घडले तसेच दिशाभूल आणि फसवणुकीचे प्रकारही निदर्शनास आले.
अगदी अलीकडच्या काळात अमेरिकेत असाच एक सनसनाटी प्रकार उघडकीस आला आहे की ज्यामुळे प्रगत राष्ट्रातही लोकांची बेमालूम फसवणूक होऊ शकते. व्यवस्था व प्रशासन या संदर्भात दीर्घकाळ गाफिल राहू शकते. फसवणूक करणारे मालामाल होऊन प्रसिद्धी व प्रतिष्ठेच्या शिखरावर अलगद पोहचू शकतात हे स्पष्ट होते. अमेरिकेत जर ही स्थिती तर इतर तुलनेत अविकसित देशातील आरोग्य व्यवस्थेत काय घडत असेल याची कल्पनाच केलेली बरी! सुदैवाने अमेरिकेतील आरोग्य क्षेत्रात झालेल्या घोटाळ्यातील आरोपी व्यक्तीस अंतिमत: न्यायालयीन प्रक्रियेद्वारे 11 वर्षे कारावासाची सजा ठोठावण्यात आली आहे. तिच्या निकटच्या सहकाऱ्यास देखील 13 वर्षांची सजा झाली आहे.
या साऱ्या घोटाळा प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे ती एलिझाबेथ होम्स नावाची एक सुस्वरुप तरुणी. या तरुणीचा जन्म आणि पालन पोषण वॉशिंग्टन येथील अत्यंत प्रतिष्ठित वस्ती ‘कॅपिटॉल हिल’ येथे राहणाऱ्या श्रीमंत कुटुंबात झाले. एलिझाबेथचे आई-वडील उच्चपदस्थ नोकरदार होते. आपली प्रतिष्ठा जपण्याकडे त्यांचा कल होता. फ्लेयमान यिस्ट या क्रांतीकारी मिश्रणाचा शोध लावून एलिझाबेथच्या खापर पणजोबांनी अमेरिकेतील बेकरी उद्योगास एकेकाळी नवे वळण दिले होते. आपल्या बालपणीच एलिझाबेथने वडिलांना एक पत्र लिहून मानवजातीला माहित नसलेला असा अभूतपूर्व शोध लावण्याची आपली महत्त्वाकांक्षा असल्याचे जाहीर केले होते. आपले पूर्वशिक्षण संपवून एलिझाबेथने 2002 साली स्टॅनफोर्ड युनिर्व्हसिटीत केमिकल इंजिनियरिंग शिकण्यास प्रवेश घेतला. या दरम्यान तिने असा एक पट्टीचा तुकडा शोधल्याचा दावा केला की, जो कोणत्याही संसर्गाच्या पृष्ठभागास निरखून गरजेनुसार प्रतिजैविकांचा पुरवठा करू शकतो. तेथील वैद्यकीय औषधशास्त्र विभागातील एक तज्ञ फिलिस गार्डनर यांच्याशी या शोधासंदर्भात एलिझाबेथने जेव्हा चर्चा केली तेव्हा गार्डनर यांनी तो सदोष असून चालणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. या संभाषणाच्यावेळी एलिझाबेथने आपल्या सल्ल्यावरच अविश्वास दाखविला इतका तिचा आत्मविश्वास (की अंधविश्वास) प्रखर होता असे डॉ. गार्डनर यांनी नमूद केले आहे.
वयाच्या 19 व्या वर्षी एलिझाबेथने शिक्षण अर्धवट सोडून ‘थेरॉनॉस’ नावाची कंपनी सुरू केली. यावेळी तिने सिलिकॉन व्हॅलीतील आपल्या कंपनीत अनेक प्रकारच्या एरवी करण्यात येणाऱ्या चाचण्या टाळून केवळ रक्ताच्या काही थेंबांसह मधुमेह कर्करोगाबरोबर अन्य 200 रोगांची अचूक निदान करणारे एक चाचणी उपकरण शोधल्याचा व ते सुयोग्य पद्धतीने विकसित केल्याचा दावा केला. इतकेच नव्हे तर हे उपकरण अनेक प्रयोग करूनही अयशस्वी होत होते आणि अंतिमत: परिश्रम व चिकाटीने यशस्विता प्राप्त झाली असे सांगत एलिझाबेथने आपल्या प्रयोगांची तुलना विद्युत दिव्याचा शोध लावणाऱ्या थॉमस अल्वा एडिसन या संशोधकाशी करून सदर उपकरणाचे नाव चक्क ‘एडिसन’ ठेवले. अशा तिच्या दिखाऊबाजीमुळे अनेक बडे मासे गुंतवणुकदार म्हणून अलगद तिच्या जाळ्यात सापडले. यात माध्यम सम्राट रुपर्ट मरडॉक, ओरॅकलचे संस्थापक लॅरी एलिसन, वॉलमार्टचे वाल्टन कुटुंब यांचा समावेश होतो. अमेरिकेचे माजी गृह सचिव जॉर्ज शुल्झ हे कंपनीचे संचालक बनले. अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री हेन्री किसिंजर, माजी मंत्री विल्यम पेरी व जीम मॅटीस अशा असामी देखील ‘थेरॉनॉस’ कंपनीच्या संचालक बनल्या. अमेरिकेसारख्या महागडी आरोग्य व्यवस्था असलेल्या देशात थेरॉनॉस स्वस्त, कमी वेळात, अचूक रक्त चाचणीचे आवाहन साऱ्यांनाच भावले आणि पाहता पाहता कंपनीचे मूल्यांकन 10 अब्ज डॉलर्सवर पोहोचले. या नेत्रदीपक यशामुळे सिलिकॉन व्हॅलीतील लोक एलिझाबेथ होम्सची तुलना संगणक क्षेत्रातील जगप्रसिद्ध उद्योजक स्टीव्ह जॉब्सशी करू लागले. प्लेट नसलेल्या काळ्या कारपर्यंत स्टीव्ह जॉब्सचे अनुकरण करीत आपले ‘लेडी स्टीव्ह जॉब्स’ असल्याचा गैरसमज वाढू दिला.
परंतु अल्पावधीतच एकामागोमाग एक किर्ती शिखरे पादाक्रांत करणाऱ्या थेरॉनॉस आणि त्याचबरोबर एलिझाबेथ होम्सच्या कर्तृत्वाचा हा फुगा फुटला. कारण त्यात खरी हवाच नव्हती. 2015 साली कंपनीतीलच एक-दोघा जागरुक माहितीगारांनी थेरॉनॉसच्या तथाकथित एडिसन रक्त चाचणीबद्दल शंका उपस्थित केल्या. काही रुग्णांकडूनही तक्रारी आल्या. अखेर अमेरिकेतील ‘द वॉल स्ट्रीट’ जर्नल या नियतकालिकात थेरॉनॉसमधील फसवणुकीवर एक लेख मालिकाच प्रकाशित झाली. त्यात एडिसन निदान किंवा चाचणी या एलिझाबेथ होम्स यांनी दावा केलेल्या संशोधनात काहीच दम नसून या तथाकथित चाचणीचे निष्कर्ष बेभरवशाचे आणि अनेकदा चुकीचे आले आहेत, असे नमूद करण्यात आले. एडिसन निदानाचा गवगवा करणारी ही कंपनी बाजारातच उपलब्ध असलेली आणि इतर उत्पादकांनी तयार केलेली चाचणी उपकरणे सर्रास वापरीत असून लोकांची फसवणूक करीत असल्याचा थेट आरोप वॉल स्ट्रीट जर्नलने केला. याचा व्हायचा तो परिणाम झाला. कंपनीविरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. गुंतवणूक, भागीदार, संचालक यांनी अर्थात कंपनीशी आपले नाते तोडले. 2016 साली जाग आलेल्या अमेरिकन आरोग्य विभाग नियमन मंडळाने थेरॉनॉसमधील रक्त चाचण्या बंद केल्या. 2018 साली या कंपनीचे विसर्जनही झाले.
एलिझाबेथ होम्सच्या जीवनात तिचा माजी प्रियकर, माजी भागीदार आणि एकेकाळचा थेरॉनॉसचा बॉस रमेश उर्फ सनी बलवानी हा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. या उभयतांच्या सहजीवनाची कथा ही देखील आगळी वेगळी आहे. तथापि मुख्य मुद्दा हा आहे की न्यायालयीन प्रक्रियेद्वारे उभयतांना शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत. बलवानी आधीच कारावासात गेला आहे तर बऱ्याच चुकवाचुकवी, जामीन अर्जानंतर 30 मे पासून एलिझाबेथ 11 वर्षांची सजा भोगण्यासाठी गजाआड झाली आहे. ती परवाच गजाआड झाल्यानंतर अमेरिका आणि जगभरातील प्रसार माध्यमात, आरोग्य क्षेत्रातील या मोठ्या घोटाळ्याबाबत उलट-सुलट चर्चा झडल्या. आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांची विश्वासार्हता यावर भाष्ये झाली. काही लेखक-कलाकारांनी या प्रकरणावर कादंबरी लिहिण्याचा, चित्रपट बनवण्याचा संकल्प जाहीर केला. सारांश हा की संशोधक होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काहीच गैर नाही. अनेकांनी ती बाळगून नवेशोध लावले आणि कित्येक आयुष्याच्या अखेरपर्यंत संशोधन करीत राहिले. परंतु अपेक्षित शोध त्यांना लागले नाहीत. या दोन्ही प्रकारच्या संशोधकांचे संपूर्ण जगावर ऋण आहेत. एलिझाबेथ यांनी मात्र प्रतिष्ठा, प्रसिद्धी आणि अतिमहत्त्वाकांक्षेपोटी संशोधन विषयक नीतीमूल्यांचा चुराडा केला आहे. या कृत्याचे फळ त्यांना आता मिळाले आहे.
-अनिल आजगावकर








