वृत्तसंस्था/ पाटणा
पाटणा उच्च न्यायालयाने मोकामाचे माजी आमदार अनंत सिंह यांच्या दोन याचिकांना स्वीकारत मोठा दिलासा दिला आहे. अनंत सिंह यांच्याविरोधात निवासस्थानातून इंसास रायफल मॅगजीन आणि बुलेटप्रूफ जॅकेट हस्तगत करण्यात आल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाकडून सिंह यांना 10 वर्षांच्या शिक्षेसह 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. उच्च न्यायालयाने या निर्णयाच्या विरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करत अनंत सिंह यांना दोन प्रकरणांमधून निर्दोष मुक्त केले आहे. दुसरे प्रकरण वडिलोपार्जित घरातून एके 47 रायफल, गोळ्या आणि 2 ग्रेनेड हस्तगत होण्याशी संबंधित होते. अनंत सिंह हे बिहारमधील बाहुबली नेते आहेत. अनंत सिंह यांना गुन्ह्यांमध्ये यापूर्वी दोषी ठरविण्यात आल्याने निवडणूक लढविता आली नव्हती. परंतु आता त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.









