सर्वोच्च न्यायालयाकडून उत्तरप्रदेश सरकारला नोटीस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तरप्रदेशच्या तुरुंगात कैद माजी मंत्री अमरमणि त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नी मधुमणि यांच्या मुदतपूर्व मुक्तता रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने दिवंगत कवयित्री मधुमिता शुक्ला यांच्या बहिणीच्या याचिकेवर उत्तरप्रदेश सरकारला नोटीस बजावली आहे. मधुमिता यांच्या हत्येप्रकरणी अमरमणि त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नी मधुमणि या गोरखपूर जिल्हा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
अमरमणि त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नी मधुमणि यांच्या दयायाचिकेवर राज्य सरकारने शिक्षा संपण्यापूर्वीच मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशावर कवयित्री मधुमिता शुक्ला यांची बहिण निधी शुक्ला यांनी आक्षेप घेतला आहे.
लखनौच्या पेपरमिल कॉलनीमध्ये 9 मे 2003 रोजी कवयित्री मधुमिता यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येवेळी मधुमिता या गरोदर होत्या. त्यांच्या हत्येप्रकरणी अमरमणि यांना सप्टेंबर 2003 मध्ये अटक करण्यात आली होती. मधुमिता या अमरमणि यांच्या प्रेयसी होत्या. या हत्येप्रकरणी माजी मंत्री अमरमणि त्रिपाठी, त्यांच्या पत्नी मधुमणि यांच्यासवेमत 4 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. अमरमणि यांनी सर्वोच्च न्यायालयात मुदतपूर्व मुक्ततेसाठी दया याचिका केली होती. यावर उत्तरप्रदेश सरकारने मुक्ततेचा आदेश दिला आहे.
मुलावरही पत्नीच्या हत्येचा आरोप
अमरमणि त्रिपाठी यांचा पुत्र अमनमणि याच्यावरही पत्नी सारा सिंहच्या हत्येचा आरोप आहे. सारा सिंह यांचा मृत्यू रस्ते दुर्घटनेत नव्हे तर गळा दाबण्यात आल्याने झाल्याचे सीबीआय चौकशीतून समोर आले होते. याप्रकरणी अमनमणिच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले होते. अमनमणि हे 2017 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते.









