बांधकामासाठी वापरलेल्या सळ्या बाहेर पडल्यामुळे अपघाताचा धोका
बेळगाव : हंदिगनूर येथील पुलावर मोठा खड्डा पडला असून या पुलाच्या निर्मितीसाठी वापरलेल्या लोखंडी सळ्या बाहेर पडल्यामुळे गावकरी व वाहनधारकांमध्ये भीती निर्माण होत आहे. आगसगा, हंदिगनूरवरून पुढे एनएच-4 व दड्डीला जोडणारा अती महत्त्वाचा रस्ता सध्या मृत्यूचा मार्ग बनत आहे. यातच आता हंदिगनूर जवळील पुलावर मोठा खड्डा पडला असून या खड्ड्यातून पूल बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी सळ्या बाहेर पडल्यामुळे लहान व मोठ्या वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या पुलाचे बांधकाम काही वर्षापूर्वी झालेले असून पुलाच्या कमकुवत बांधकामाबद्दल नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. या पुलावर याआधीही खड्डा पडला होता त्यावेळी अनेक तक्रारीनंतर ग्राम पंचायतीने तात्पुरता त्याची डागडुजी केली होती. परंतु आता पावसाच्या सुरुवातीलाच सर्व उखडून गेल्याने गावकरी व चालकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. गेल्या पंधरवड्यात याच मार्गावर टिप्परमुळे अपघात झालेले असून दोघाच्या मृत्यूचीही नोंदणी झालेली आहे. या भागातील अनेक व्यावसायिक, कामगार, नोकरदार आपल्या कामानिमित्त या रस्त्याचा वापर करत असतात. या खड्ड्याबद्दल गावकऱ्यांनी ग्राम पंचायतीकडे अनेकवेळा तक्रार करूनदेखील यावर पंचायत सदस्यांनी लक्ष दिलेले नाही. या गंभीर समस्येवर कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थ व चालकांनी केली आहे.









