अमेरिकन वायुसेनेची सतर्कता : तात्काळ पाठवली एफ-16 फायटर जेट
► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत भंग झाल्याची घटना समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी न्यू जर्सीतील बेडमिन्स्टर येथील आपल्या खासगी गोल्फ कोर्सवर विकेंड साजरा करत असताना त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याने खळबळ उडाली. सदर गोल्फ कोर्सवरून एक विमान जात असताना एफ-16 लढाऊ विमानाने तात्काळ कारवाई करत त्याला रोखले. हे नागरी विमान न्यू जर्सीमधील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेडमिन्स्टर गोल्फ क्लबवरून नो-फ्लाइंग झोनमध्ये घुसले होते.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प शनिवार-रविवारी विकेंडमुळे न्यू जर्सीमध्ये पोहोचले होते. ते पोहोचलेला परिसर तात्पुरता उ•ाणांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, तरीही एक विमान त्यांच्या हवाई क्षेत्रात घुसल्यानंतर त्याला तातडीने रोखण्यात आले. प्राथमिक तपासात घुसखोर विमानाकडून कोणताही धोका नव्हता, असे स्पष्ट झाले आहे. तरीही या प्रकाराबाबत वायुदलाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. परिस्थिती शांततेत नियंत्रणात आणण्यात आली आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सुरक्षेत कोणतीही तडजोड करण्यात आली नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.









