अनेक शाळकरी मुलींच्या शोषणामुळे धार्मिक तणाव
वृत्तसंस्था/जयपूर
राजस्थानच्या बीवार जिल्ह्यात एक मोठे वासनाकांड उघडकीस आले आहे. या वासनाकांडामुळे या जिल्ह्याच्या मासुदा नगरात मोठा धार्मिक तणाव निर्माण झाला आहे. साधारणत: 1 लाख लोकवस्तीच्या या नगरात अनेक शाळकरी मुलींना या वासनाकांडाची शिकार बनविण्यात आले असून त्यांना ब्लॅकमेल केले जात आहे. काही मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी तक्रार सादर केल्याने हे प्रकरण उघडकीस आले असून आतापर्यंत 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या नगराचा माजी नगरसेवक हकीम कुरेशी यालाही या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
मासुदाचे पोलीस अधिकारी सज्जन सिंग यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्व आरोपी ‘विशिष्ट’ धर्माचे आहेत. तर शोषण करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थिनी ‘अन्य’ धर्माच्या आहेत. त्यामुळे नगरात धार्मिक तणाव निर्माण झाला असून दोन दिवस नगरातील सर्व व्यवहार ठप्प होते. अनेक पिडीत मुलींचे व्हिडीओ काढण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल केले जात आहे, असा आरोप करण्यात आला आहे. सर्व आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली असून त्यांची कसून चौकशी होत असल्याची माहिती देण्यात आली.
सोशल मिडियावरुन संपर्क
विशिष्ट धर्माच्या आरोपींनी या विद्यार्थिनींशी सोशल मिडियावरुन संपर्क केला आणि त्यानंतर त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. अनेक मुलींवर धर्म बदलण्याची सक्तीही करण्यात येत आहे, अशा तक्रारी सादर करण्यात आल्या आहेत. अशा किती मुलींचे शोषण करण्यात आले आहे, याचा शोध पोलिसांकडून केला जात आहे. अनेक मुली आणि त्यांचे पालक तक्रार करण्यासाठी आता पुढे येत असले तरी, इतर अनेक अब्रू जाण्याच्या भीतीपोटी मूक आहेत, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन चौकशी केली जाईल, असे प्रतिपादन राजस्थानच्या सरकारकडून करण्यात आले असून तपासाची चक्रे वेगाने फिरु लागली असल्याची माहिती या प्रकरणी सूत्रांनी दिली आहे.
पिडित विद्यार्थिनींकडून माहिती
विशिष्ट धर्माच्या 14 ते 15 तरुणांकडून हे वासनाकांड घडविण्यात येत असल्याची माहिती काही शोषित विद्यार्थिनींनी काही टीव्ही वाहिन्यांना दिली आहे. लैंगिक शोषणाबरोरबच या मुलींचे आर्थिक शोषणही करण्यात येत आहे. अनेक शाळांमधील अनेक मुलींना शिकार बनविण्यात आल्याचा पोलिसांचा संयश आहे. पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल, लॅपटॉप्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधने जप्त केली असून त्यांची गुन्हावैज्ञानिक तपासणी केली जात आहे.
नागरीक रस्त्यावर
या वासनाकांडाच्या निषेधार्थ मासुदा नगरात दोन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे सर्व व्यापार ठप्प होता. मासुदा प्रमाणेच बिजाईनगर, केकडी आणि सरवाड या नगरांमध्येही हजारो नागरीकांनी निषेध मोर्चे काढून या वासनाकांडाचा निषेध केला. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करुन त्यांच्यावर त्वरीत अभियोग चालवावा आणि त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी नागरीकांच्या संघटनांनी केली आहे.









