ऑक्टोबरमध्ये 1.72 लाख कोटींची कमाई : मागील वर्षीच्या तुलनेत 13 टक्के वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सणासुदीच्या काळात आर्थिक आघाडीवर एक चांगली बातमी आली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये देशातील जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 13 टक्क्मयांनी वाढून 1.72 लाख कोटी रुपये झाले. बुधवारी अर्थ मंत्रालयाने ऑक्टोबर 2023 मधील जीएसटी संकलन आकडेवारी जारी केली.
अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर 2023 मध्ये 1,72,003 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. यामध्ये 30,062 कोटी रुपये सीजीएसटी, 38,171 कोटी रुपये एसजीएसटी, 91,315 कोटी रुपये आयजीएसटी आणि 12,456 कोटी रुपये सेसद्वारे जमा झाले आहेत. जुलै 2017 रोजी जीएसटी लागू झाल्यापासून ऑक्टोबर 2023 मधील जीएसटी संकलन ही दुसरी सर्वोच्च पातळी आहे. तसेच कर संकलनाने 1.60 लाख कोटी रुपयांचा आकडा पार करण्याची चालू आर्थिक वर्षातील ऑक्टोबर हा पाचवा महिना आहे.
नियमित सेटलमेंटनंतर, ऑक्टोबर 2023 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 72,934 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 74,785 कोटी रुपये इतका होता. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सरासरी सकल मासिक जीएसटी संकलन आता 1.66 लाख कोटी रुपये आहे. हे संकलन गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीपेक्षा 11 टक्के अधिक आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पानुसार केंद्राने आपल्या जीएसटी संकलनात आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 12 टक्के वाढ होण्याची अपेक्षा केली आहे.
सप्टेंबरमध्ये 1,62,712 कोटी
सप्टेंबर 2023 मध्ये, सरकारी तिजोरीत जीएसटीमधून 1,62,712 कोटी रुपये मिळाले होते. हे सप्टेंबर 2022 च्या तुलनेत 10.2 टक्क्यांनी अधिक होते. तसेच सप्टेंबरचे जीएसटी संकलन ऑगस्टच्या तुलनेत 2.3 टक्के अधिक होते. सलग सातव्या महिन्यात मासिक जीएसटी संकलन 1.50 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.









