अजित पवार गटाबरोबर जाणेच उचित ठरेल असाही सूर
चंदगड / प्रतिनिधी
गेल्या वर्षभरात केवळ विरोधी सत्ता आल्याने मतदारसंघात अपेक्षित निधी आणण्यात अडचणी आलेल्या आहेत. हलकर्णी औद्योगिक वसाहतीतील ट्रामा केअर सेंटरचे कामही रेंगाळलेले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अजूनही सव्वा वर्षाचा कालावधी आहे. या काळात अधिकाधिक विकास निधी आणून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलायचा असेल तर अजित पवार गटाबरोबर जाणेच उचित ठरेल, असे मत उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त करून पुढील योग्य तो निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आमदार राजेश पाटील यांनाच बहाल करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या अडकूर येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी चंदगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भिकू गावडे होते.
अजित पवार यांच्यामुळे हलकर्णी औद्योगिक वसाहतीत ट्रामा केअर सेंटर तसेच उचंगी पाटबंधारे प्रकल्पासाठी मोठी मदत झाली आहे. शरद पवार हे आपले दैवत असले तरीही मतदारसंघाच्या विकासाचा विचार करून आमदार राजेश पाटलांनी अजित पवारांबरोबर जाणे बदलत्या राजकीय समीकरणात योग्य ठरेल, असा कौल उपस्थित कार्यकर्त्यांनी दिला. प्रास्ताविक जयसिंग चव्हाण यांनी केले.यावेळी चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आजरा तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष मुकुंद देसाई, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष बाबासाहेब पाटील, अल्बर्ट डिसोजा, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभयराव देसाई, संचालक बाळासाहेब बांदिवडेकर, माजी शिक्षण सभापती भरमाणा गावडा, एस. एल. पाटील, तानाजी गडकरी, विठोबा गावडे, महादेव प्रसादे, अनिल सुरतकर, विनोद पाटील, अशोकराव देसाई, बाळासाहेब घोडके आदींची उपस्थिती होती.









