जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालणे गरजेचे
बेळगाव : जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड लाच घेताना लोकायुक्त जाळ्यात अडकले. परंतु, शिक्षणाधिकारी कार्यालयातील अद्याप बडे मासे गळाला लागलेले नाहीत. शिक्षणाधिकारी कार्यालय भ्रष्टाचारात बरबटलेले आहे, हे सवर्नांच माहीत आहे. परंतु, केवळ एकच अधिकारी यामध्ये सहभागी नसून इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्र म्हणजे विद्येचे मंदिर समजले जाते. परंतु, मागील काही वषर्मिंध्ये भरती प्रक्रिया, बदली तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार घेण्यासाठीही आता चिरीमिरी द्यावी लागत आहे. नवीन शाळा स्थापन करण्यासाठी लागणारी परवानगी, जुन्या परवानगीचे नूतनीकरण यासाठी तर लाखोंचा व्यवहार केला जात आहे. यामध्ये गटशिक्षणाधिकारी तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील काही बडे मासे सहभागी आहेत. स्वत: लाच न मागता कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडून हे व्यवहार केले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच आदर्श शिक्षक पुरस्कारांची यादी जाहीर झाली. नि:स्वार्थी भावनेने सेवा दिलेल्या शिक्षकांना वगळून आर्थिक देवघेव करत इतरांना पुरस्कार जाहीर केले, असा आरोप काही शिक्षकांनी थेट माध्यमांसमोर केला होता. यामुळे केवळ शिक्षक भरती अथवा बदलीसाठी एवढेच नाही तर आता आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठीही मोठी किंमत मोजावी लागत आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मिळून असे प्रकार करत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
कनिष्ठस्तरावर छोटे मासे मुक्तपणे लाटताहेत मलिदा
कित्तूर तालुक्यातील तुरमुरी येथील एका शाळेच्या परवाना नूतनीकरणासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी 40 हजारांची मागणी केली होती. यावेळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडले. शिक्षणाधिकाऱ्यांच्या रुपाने मोठा मासा जाळ्यात सापडला असला तरी अद्याप कनिष्ठस्तरावर छोटे मासे मुक्तपणे लाचखोरीचा मलिदा लाटत आहेत. त्यांच्यावर कधी कारवाई होणार? असा प्रश्न पीडित शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांतून विचारला जात आहे.
टपरीवर ठरताहेत सौदे…
जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकारी कार्यालयात कमी आणि समोरील टपरीवर अधिककाळ दिसून येतात. क्लब रोड परिसरात रस्त्याशेजारी असणाऱ्या पानपट्ट्यांवरच अनेक व्यवहार ठरवले जातात. कार्यालयात कोणालाही संशय येऊ नये यासाठी हा खटाटोप सुरू असतो. जिल्ह्याभरातून आपल्या विविध कामांसाठी कार्यालयात येणारे शिक्षक मात्र अधिकारी येण्याची वाट पाहात बसलेले असतात. परंतु, अधिकारी मात्र चिरीमिरी मिळविण्याच्या नादात तासन्तास बाहेर राहून सौदे ठरवत असल्याने शिक्षकांमधूनही संताप व्यक्त होत आहे.









