वृत्तसंस्था/ अहमदाबाद
2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील चेन्नई बरोबरच्या सामन्यात षटकांची गती राखता न आल्याने गुजरात टायटन संघाला विक्रमी दंड करण्यात आला आहे. गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याला 24 लाख रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे या संघातील प्रत्येक खेळाडूला मिळणाऱ्या मानधन रकमेतील 25 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावे लागणार आहे. गुजरातचा संघ स्पर्धेच्या गुणतक्त्यात 12 सामन्यातून 10 गुणासह सध्या आठव्या स्थानावर आहे. तर चेन्नईचा संघ 12 गुणासह चौथ्या स्थानावर आहे.
गुजरात आणि चेन्नई यांच्यात शुक्रवारी येथे झालेल्या सामन्यात गुजरातने चेन्नईचा दणदणीत पराभव केला. या सामन्यात कर्णधार गिल आणि साई सुदर्शन यांनी शानदार शतके झळकविली. या जोडीने सलामीच्या गड्यासाठी 210 धावांची भागिदारी केली. गिलने 55 चेंडूत 104 तर साई सुदर्शनने 51 चेंडूत 103 धावा झोडपल्या.









