सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला ः गुंतवणूकदारांचे नुकसान
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील दोन दिवसांच्या तेजीला अखेर तिसऱया सत्रात बुधवारी पूर्ण विराम मिळाला आहे. यामध्ये बुधवारच्या सत्रात जागतिक पातळीवरील चिंताजनक स्थितीमुळे गुंतवणूकदारांनी काही प्रमाणात नफावसुली केल्याने बाजारामध्ये सेन्सेक्स 600 पेक्षा अधिक अंकांनी कोसळला होता.
दिवसअखेर सेन्सेक्स 636.75 अंकांच्या घसरणीसोबत 60,657.45 निर्देशांक बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 189.60 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 18,042.95 वर बंद झाला आहे. दोन दिवसांच्या तेजीनंतर मोठी घसरण बाजारात राहिल्याचे दिसून आले. नवीन वर्षातील ही पहिलीच मोठी घसरण आहे. बीएसईमधील जास्तीत जास्त क्षेत्रातील निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत.
दिग्गज कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी आणि टीसीएस तेजीसोबत बंद झाला आहे.तर अन्य कंपन्यांच्या समभागांमध्ये टाटा स्टील, टाटा मोर्ट्स आणि पॉवरग्रिडचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत.
विक्रीमधील क्षेत्रे
बुधवारच्या सत्रात प्रामुख्याने मिडकॅप, स्मॉलकॅप यांच्या समभागातील विक्रीमुळे ही पडझड झाली. यामध्ये दिग्गज क्षेत्रात धातू, रियल्टी आणि बँकिंग क्षेत्रातील नफावसुलीचा परिणाम यामध्ये झाला आहे.
सोन्याची चमक
सोने दरात कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या दरम्यान ऑगस्ट 2020 मध्ये उच्चांकी किमत राहिली होती, तेव्हा सोने 56,200 इतके प्रति दहा ग्रॅममागे राहिले होते. बुधवारी नोंदवण्यात आलेला सोन्याचा दर हा 56,142 वर राहिला असून हा सर्वाधिक दर राहिल्याची नोंद केली आहे.
जागतिक बाजारातील स्थिती
जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतामुळे काहीशी नफावसुली राहिली होती. जागतिक बाजारात अमेरिकेतील बाजार तेजीत होते. आशियाई बाजारात काही निर्देशांक तेजीत तर काही निर्देशांक घसरणीसह कार्यरत होते.









