नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आफताब पूनावाला श्रद्धा वालकर हिच्या केलेल्या हत्येप्रकरणी एक मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. श्रद्धा आणि आफताब यांच्यात झालेल्या भांडणाची ध्वनिफित पोलिसांच्या हाती लागली आहे. या ध्वनिफितीत तो श्रद्धा वालकर हिच्याबरोबर अतिशय असभ्य, शिवराळ आणि अर्वाच्च्य भाषेत भांडण करताना ऐकू येतो अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
ही ध्वनिफीत पोलिसांना आफताब पुनावाला याची तपासणी करताना सापडली अशी माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीतील साकेत न्यायालयाने आफताब पुनावाला याच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली. त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यासही न्यायालयाने पोलिसांना अनुमती दिली आहे. त्यानुसार त्याला गुन्हाविज्ञान शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले. शोधण्यात आलेल्या ध्वनिफीतीतील आवाजाशी त्याच्या आवाजाची तुलना करुन पाहण्यात येणार आहे.
पुनावाला याने श्रद्धा वालकर हिचा 18 मे 2022 यादिवशी खून केला. त्याने तिचे 35 तुकडे करुन ते फ्रीझमध्ये लपवून ठेवले होते. त्यानंतर त्याने ते तुकडे टप्प्याटप्प्याने आजूबाजूच्या वनप्रदेशात नेऊन पुरण्याचा प्रयत्न केला होता. यापैकी काही तुकडे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आणखी पुरावेही हाती लागले आहेत.









