किरकोळ बाजारात 10 ते 15 रुपये किलो
बेळगाव :
मागील चार दिवसांत टॉमेटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात 10 ते 15 रुपये किलो प्रमाणे विकले जात आहेत. टोमॅटोचे दर गडगडल्याने उत्पादक शेतकरी मात्र हतबल झाले आहेत. उत्पादनाचा खर्च निघत नसल्याने मोठे संकट उभे ठाकले आहे. दरम्यान टोमॅटो शेतीवर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे.
होलसेल भाजी मार्केटमध्येही टोमॅटोचे दर खाली आले आहेत. आवकही अधिक प्रमाणात वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. मागील आठवड्यात 20 ते 25 रुपये किलो असणारा टोमॅटो 10 ते 15 रुपयांवर आला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर चिंता निर्माण झाली आहे. टोमॅटोचा दर कमी झाल्याने सर्वसामान्यांपर्यंत खरेदी होऊ लागली आहे. दुसरीकडे मात्र उत्पादनाचा खर्च देखील निघत नसल्याने टोमॅटो जागेवर पडून आहे.
बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा आणि तालुक्यातील विविध भागामध्ये टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. काही ठिकाणी टोमॅटो काढणीला प्रारंभ झाला आहे. मात्र दर पूर्णपणे घसरल्याने टोमॅटोची करावे काय? असा प्रश्नही उत्पादकांसमोर आहे. दराअभावी टोमॅटो शेतातच कुजून पडत असल्याचेही दिसत आहे. हळूहळू भाजीपाल्याला मागणी वाढत असतानाच टोमॅटोच्या दर खाली उतरल्याने उत्पादक शेतकरी हतबल झाले आहे.









