फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाकडे लक्ष : निफ्टीही घसरणीत
मुंबई :
जागतिक बाजारातील मिळत्याजुळत्या संकेताच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअरबाजारात मंगळवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेतील फेडरल बँकेचा व्याजदर कपातीचा निर्णय होण्याच्यापूर्वी बाजारात गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत. सेन्सेक्स मंगळवारी 1 हजारांनी कोसळला तर निफ्टीही 332 अंकांनी घसरणीत राहिला होता. याचदरम्यान गुंतवणूकदारांना मंगळवारी 3 लाख कोटी रुपये गमवावे लागले आहेत.
मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1064 अंकांनी घसरत 80685 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 332 अंकांनी घसरत 24336 अंकांव बंद झाला. व्यापार तुट वाढण्याचे कारणही बाजाराला दबावात टाकण्यास कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे. फेडरल रिझर्व्हचा व्याजदराबाबत निर्णय होणार असून त्याबाबत गुंतवणूकदार सावध आहेत. आज बाजारात सकाळपासूनच दबावाचे वातावरण पाहायला मिळाले. सेन्सेक्समधील 30 पैकी 29 समभाग घसरणीत असताना दिसले. रिलायन्स इंडस्ट्रिज आणि एचडीएफसी बँकेचे समभाग मंगळवारी सर्वाधिक प्रमाणात घसरले होते. यांनी बाजाराला खाली खेचण्यात योगदान दिलं होतं. सकाळीच सेन्सेक्स निर्देशांक 200 अंकांच्या घसरणीसोबत 80,612 च्या स्तरावर खुला झाला होता. निफ्टीतील 50 पैकी 48 समभाग नुकसानीसोबत बंद झाले.
हे समभाग घसरणीत
हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फायनान्स, सनफार्मा, टेक महिंद्रा, ट्रेंट, टायटन, स्टेट बँक, अॅक्सिस बँक, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, एशियन पेंटस्, ओएनजीसी, नेस्ले, टीसीएस, हिंडाल्को, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, अदानी एंटरप्रायझेस, विप्रो, इन्फोसिस, एनटीपीसी, बीपीसीएल, कोल इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील, आयशर मोटर्स, लार्सन टुब्रो, हिरो मोटोकॉर्प यांचे समभाग घसरलेले दिसून आले. यात औषध कंपनी सिप्लाचे समभाग मात्र तेजीत दिसून आले.
निर्देशांकांची कामगिरी
विविध निर्देशांकावर नजर टाकल्यास आयटी निर्देशांक 0.53 टक्के घसरणीत होता. फार्मा 0.81 टक्के, बँक निफ्टी 1.39 टक्के, ऑटो निर्देशांक 1.57 टक्के कमकुवत होत बंद झाला. पीएसयु बँक निर्देशांकही 1.82 टक्के इतका घसरणीत होता.









