पेट्रोलमध्ये 10 टक्के, तर डिझेलच्या मागणीत 15 टक्क्यांची घसरण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मागील 10 दिवसांपासून स्थिर असले तरीही त्यापूर्वी 14 वेळा त्यांच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली होती. 22 मार्चपासून सुरू झालेल्या दरवाढीमुळे किमतीत 10 रुपये प्रतिलिटरने वाढ झाली होती. तर शनिवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये केवळ 15 दिवसांमध्ये देशात पेट्रोलची मागणी मागील महिन्याच्या समान कालावधीच्या तुलनेत 10 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
1 ते 15 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार पेट्रोलच्या मागणीत 10 टक्क्यांची घट झाली आहे. तर याच कालावधीत डिझेलची मागणी मागील महिन्याच्या समान कालावधीच्या तुलनेत 15.6 टक्क्यांनी कमी झाली. याचबरोबर घरगुती गॅस सिलिंडरच्या मागणीत देखील दरवाढीमुळे मोठी घसरण झाली आहे. या कालावधीत एलपीजीच्या मागणीत मासिक हिशेबानुसार 1.7 टक्क्यांची घट झाली आहे.
4 नोव्हेंबर 2021 नंतर पासून देशात सलग 134 दिवस म्हणजेच साडेचार महिन्यांहून अधिक काळापर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिले होते. परंतु 22 मार्चपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली. 17 दिवसांमध्ये 14 वेळा त्यांचे दर बदलले. 22 मार्चपासून 6 एप्रिलपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 रुपये प्रतिलिटरने वाढ झाली. परंतु 6 एप्रिलनंतर पुन्हा एकदा दोघांचे दर स्थित राहिले आहेत.
विमानाचे इंधन महागले
पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच नव्हे तर देशात मागील काही दिवसांपासून जेट फ्यूल (एटीएफ)च्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. शनिवारी 0.2 टक्क्यांच्या वृद्धीसह विमान इंधनाची किंमत उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे. एटीएफची किंमत 1,13,202.33 रुपये प्रति किलोलिटरवर पोहोचली आहे. या दरवाढीमुळै एटीएफच्या मागणीत मासिक आधारावर 20.5 टक्क्यांची घट झाली आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम
रशिया आणि युक्रेन युद्धामुळे फेब्रुवारीच्या अखेरपासून आतापर्यंत कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडलेले आहेत. काही दिवसांपूर्वी कच्च्या तेलाचा दर 139 डॉलर्स प्रतिबॅरलपर्यंत पोहोचला होता. सध्या हा दर 105 डॉलर्स प्रतिबॅरलवर आहे. रशिया हा कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा उत्पादक असल्याने आणि त्याच्यावर अनेक देशांनी निर्बंध लादल्याने जागतिक बाजारपेठेत कच्चे तेल महागले आहे.









