टाळसुरे वार्ताहर
दापोली महावितरण उपविभागाचा उपकार्यकारी अभियंता अमोल विंचूरकर याला 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या मुसक्या आवळल्या. दापोलीमधील इलेक्ट्रिक कॉन्ट्रक्टरच्या पक्षकाराने केलेल्या प्लॉटिंगवर बसवण्यात येणाऱ्या 110 के.व्ही. वीज भार व ट्रान्सफॉर्मर या कामाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देऊन तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यासाठी विंचूरकर याने 80 हजार रुपयांची मागणी केली. यापैकी 50 हजार रुपये लाच स्वीकारताना विंचूरकर याला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. पोलीस निरीक्षक अनंत कांबळे, पोलीस हवालदार विशाल नलावडे, पोलीस शिपाई हेमंत पवार, प्रशांत कांबळे यांनी ठाणे परिक्षेत्र लाच प्रतिबंधक विभागो पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, ठाणे परिक्षेत्र अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रत्नागिरी पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पर्यवेक्षणाखाली सापळा रचून विंचूरकर याला अटक केली. दरम्यान, विंचूरकर याला अटक झाल्यामुळे दापोलीत खळबळ उडाली आहे.
दापोलीत होणाऱ्या नवीन प्लॉटिंगमध्ये वीजेचे कनेक्शन देण्यासाटी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा होत होती. तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्यामुळे या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करणे कठीण होत होते. विंचूरकर याच्यावर झालेल्या कारवाईमुळे भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी सुशांत चव्हाण यांच्यामार्पत जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्यावतीने एखाद्या व्यक्तीने शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ संपर्क करून माहिती देण्यात यावी. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे. दापोली पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.