फाडा संघटनेच्या माहितीत स्पष्ट : 45 हजार 806 दुचाकींची जूनमध्ये विक्री
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
फेम 2 संबंधात सरकारच्या निर्णयामुळे मागच्या म्हणजेच जून महिन्यात इलेक्ट्रिक दुचाकींची एकंदर विक्री जवळपास 57 टक्के इतकी घसरली असल्याचे दिसून आले आहे. इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीतील घट ही मोठी मानली जात आहे.
मेच्या तुलनेत ही घसरण दिसली आहे. वर्षाच्या स्तरावर पाहता विक्रीत 3 टक्के इतकी वाढ आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन अर्थात फाडा यांच्या अहवालात ही बाब अधोरेखीत करण्यात आली आहे. फेम 2 संबंधीत सवलतीत घट करण्याच्या सरकारच्या नकारात्मक निर्णयानंतर कंपन्यांनी वाहनांच्या किमतीत वाढ केली. परिणामी जूनमध्ये वाहन विक्रीत घट पाहायला मिळाली.
किती विक्री झाली
जून 2023 मध्ये एकंदर 45 हजार 806 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली आहे. मेमध्ये हीच विक्री 1 लाख 4 हजार 829 इतकी होती. जून 2022 मध्ये ही विक्री 44 हजार 381 इतकी होती. ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या वाहन विक्रीत जवळपास 38 टक्के इतकी घसरण झाली आहे. त्यांनी जूनमध्ये 17 हजार 579 वाहनांची विक्री केली आहे. याआधीच्या मे महिन्यात विक्री 28 हजार 469 इतकी होती. दुसरीकडे टीव्हीएसलाही इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीत मोठ्या घसरणीला सामोरे जावे लागले आहे. टीव्हीएसने 61 टक्के घसरणीसोबत जूनमध्ये 7 हजार 807 दुचाकींची विक्री केली.
का घसरण झाली
अवजड उद्योग मंत्रालयाने मागच्या महिन्यात फेम टू अंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकींच्या सवलतीत प्रति किलोवॅटमागे 15 हजार रुपयांहून 10 हजार रुपये कपात केली. हा लाभ कंपन्यांना मिळत नसल्याने आता किमती दर वाढवण्याचा पर्याय कंपन्यांनी अवलंबला. परिणामी वाहन खरेदीत घसरण दिसली.









