तामिळ कवीचे वक्तव्य, हिंदू संघटनांकडून टीकास्त्र
वृत्तसंस्था /चेन्नई
प्रसिद्ध तामिळ कवी आणि गीतकार वैरामुथू यांनी भगवान रामचंद्रांच्या संबंधात एक वक्तव्य करुन नवा वाद निर्माण केला आहे. त्यांच्या विधानामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत असून अनेक हिंदू संघटनांनी त्यांच्याकडून क्षमायाचनेची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षानेही त्यांच्यावर शरसंधान करत त्यांनी हिंदूंच्या धर्मभावना आपल्या अश्लाघ्य विधानामुळे दुखावल्याचा आरोप केला आहे. हे वादग्रस्त विधान त्यांनी तामिळनाडूतील एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात केले. तामिळ रामायणाचे लेखन करणारे प्राचीन लेखक कंबार यांच्या सन्मानार्थ या पुरस्कारांचे वितरण केले जाते. या कार्यक्रमाला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हेही उपस्थित होते. पत्नी सीतेचे अपहरण झाल्यानंतर रामाचे मानसिक संतुलन बिघडले आणि नंतर त्याने त्या अवस्थेतच अनेक कृत्ये केली, असे विधान त्यांनी पुरस्कार वितरण समारंभातील त्यांच्या भाषणात काही दिवसांपूर्वी केले.
आणखीही वादग्रस्त विधाने
केवळ एवढे बोलून ते थांबले नाहीत. रामाने मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत जी कृत्ये केली ती त्याने तशा अवस्थेत केल्याने कवी कंबार यांनी रामाला दोषमुक्त ठरविले आहे. यामुळे राम हा मानव ठरतो आणि कवी कंबार हे देव ठरतात, अशी पुस्ती त्यांनी जोडली. हा या कवीचा खोडसाळपणा आहे, अशी टीका केली जात आहे. सोशल मिडियावरही त्यांना दूषणे दिली जात आहेत.
भावना दुखावणारे वक्तव्य
वैरामुथू यांनी ही विधाने करण्याचे काहीच कारण नव्हते. ज्या कार्यक्रमात त्यांनी ही विधाने केली, तेथे अशी विधाने करण्याचे कोणतेही प्रयोजन नव्हते. त्यांनी हेतुपुरस्सर हिंदूंच्या आणि रामभक्तांच्या भावना दुखावण्यासाठी हे विधाने केली आहेत. मुख्यमंत्री स्टॅलिन हे देखील त्यावेळी तेथे उपस्थित होते. तथापि, त्यांनी मौन पाळले आहे. याचा अर्थ त्यांची मूक संमती आहे, हे सिद्ध होते. अशा प्रकारे हिंदूंच्या भावना दुखावून कोणतेही राजकारण साध्य करता येणार नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे तामिळनाडू अध्यक्ष नयनार नागेंद्रन यांनी केली आहे.









