पंजाबमधील बडे अधिकारी निशाण्यावर, पाकिस्तानच्या मदतीने हल्ल्यांचा कट
► वृत्तसंस्था / चंदीगड
खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) पंजाबमध्ये मोठा दहशतवादी कट रचत आहे. सुरक्षा यंत्रणांनी याबाबत अलर्ट जारी केला आहे. ‘बीकेआय’ पाकिस्तानच्या मदतीने पंजाबमध्ये मोठ्या हल्ल्याची योजना आखत आहे. पंजाबचे वरिष्ठ पोलीस अधिकारी दहशतवादी संघटनेच्या निशाण्यावर असून राज्यातील काही सक्रीय गुन्हेगारांची मदत घेतली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यांसाठी पाकिस्तानातून शस्त्रास्त्रे आणि स्फोटके पुरवल्याची माहिती मिळाली आहे.
‘बीकेआय’चा म्होरक्या परमजीत सिंग पम्मा हा पाकिस्तानच्या मदतीने भारतात दहशतवादी हल्ल्याची योजना आखत असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी अलर्टमध्ये म्हटले आहे. पम्मा याला एनआयएने मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश केला आहे. पंजाबचे वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी हेच खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पम्माचे मुख्य लक्ष्य असल्याचे समजते. त्याचबरोबर या दहशतवाद्यांच्या टार्गेटमध्ये धार्मिक आणि सामाजिक नेत्यांचाही समावेश आहे. या मोठ्या कट-कारस्थानामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी सुरक्षा दले सतर्क झाली आहेत.
पंजाबच्या बड्या गँगस्टरची मदत
दहशत पसरवण्यासाठी दहशतवादी परमजीत सिंग पम्मा पंजाबचा मोठा गँगस्टर जग्गू भगवानपुरिया टोळीचीही मदत घेऊ शकतो. पंजाबच्या तुऊंगात बंद असलेला पंजाबचा मोठा गँगस्टर जग्गू भगवानपुरिया याचे ड्रग्ज आणि शस्त्रास्त्र पुरवठ्याचे मोठे नेटवर्क आहे. त्याच्या नेटवर्कचा वापर करून खलिस्तानी दहशतवादी संघटना राज्यात घातपाती कारवाया घडवण्यासाठी सज्ज होत असल्याचा गुप्तचर विभागाचा दावा आहे.









