‘एका मताने काही होणार नाही’ ही मानसिकता बदला,
प्रतिनिधी/ पणजी
आपल्या एका मताने काय फरक पडणार? असा नकारात्मक विचार करून कोणत्याही मतदाराने आपला मतदानाचा पवित्र हक्क वाया घालवू नये. कारण लोकशाहीत प्रत्येक मत महत्त्वाचे असून एका मतानेसुद्धा मोठे बदल घडू शकतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडून निवडणूक नामक लोकशाही उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन गोवा निवडणूक आयुक्त डब्ल्यू व्ही रमणमूर्ती यांनी केले.
पणजीतील आयनॉक्स कोर्टयार्डमध्ये शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील 186 ग्रामपंचायतींसाठी येत्या दि. 10 रोजी होणाऱया निवडणुकीची जागृती करण्याच्यादृष्टीने आयोगातर्फे अनोखे बोधचिन्ह (लोगो) तयार करण्यात आले असून रमणमूर्ती यांच्याहस्ते या चिन्हाचे अनावरण करण्यात आले. पंचायत पातळीवर प्रथमच अशा प्रकारे जागृती अभियान हाती घेण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
येत्या दि. 10 रोजी राज्यातील सुमारे 8 लाख मतदार एकूण 5038 मतदारांचे राजकीय भवितव्य सुनिश्चित करणार आहेत. 64 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले आहेत. सध्या सर्व उमेदवार प्रचारात व्यस्त असून रात्री 10 वाजेपर्यंतच त्यांना प्रचार करता येणार आहे. दि. 12 रोजी मतमोजणी होणार आहे, असे रमणमूर्ती यांनी सांगितले.
कार्यक्रमास उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी ज्योती कुमारी, आयोगाचे सचिव ब्रिजेश मणेरकर आणि साहाय्यक संचालक सागर गुरव आदींची उपस्थिती होती.
त्यावेळी बोलताना मामू हागे यांनी उत्तर गोव्यातील एकूण निवडणूक स्थिती आणि तयारीची माहिती दिली. उत्तर गोव्यात 97 ग्रामपंचायती असून त्यांच्या 830 प्रभागांसाठी 736 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. या पंचायतींसाठी उमेदवारी दाखल केलेल्यांमधील 41 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांचे संबंधित प्रभाग वगळून उर्वरित 788 प्रभागांत निवडणूक होणार आहे. उत्तर गोव्यात 2667 उमेदवार आहेत तर 4 लाख 5 हजार 993 मतदार आहेत. त्यात 48.7 टक्के पुरूष आणि 51.29 टक्के महिलांचा समावेश आहे. त्याशिवाय दोघे तृतीयपंथी मतदारही आहेत. बार्देशमध्ये रेईश मागूस येथे 12 आणि चिंबल तिसवाडीत 9 संवेदनशील मतदान केंद्रे घोषित करण्यात आली आहेत. प्रत्येकी 10 निर्वाचन आणि साहाय्यक निर्वाचन अधिकारी या निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवतील, असे हागे यांनी सांगितले.
निवडणूक आचारसंहिता तसेच अन्य कोणतेही नियमभंग होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी तीन टीम कार्यरत असतील. त्यात फ्लाईंग स्कॉड, विभागीय अधिकारी, अबकारी अधिकारी यांच्या टीमचा समावेश असेल, अशी माहिती त्यांनी दिली.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांनी बोलताना दक्षिण गोव्यातील निवडणूक स्थिती आणि तयारीचा आढावा घेतला. दक्षिण गोव्यात सात तालुक्यात मिळून 89 ग्रामपंचायती आहेत. प्रत्येकी 11 निर्वाचन आणि साहाय्यक निर्वाचन अधिकारी यांच्या देखरेखीखाली सर्व यंत्रणा काम करणार आहेत. त्याशिवाय आचारसंहिता भंग होऊ नये, उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच शस्त्रास्त्रे, मद्याचा वापर टाळणे, यासारख्या विविध कामांसाठी 99 फ्लाईंग स्कॉड आणि अन्य देखरेख टीमस् नियुक्त करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी पुढे सांगितले. आयोगाचे सचिव ब्रिजेश मणेरकर यांनी आभारप्रदर्शन केले.









