मोहाली :
पंजाबमध्ये अकाली दलाचे नेते विक्रम सिंह मजीठिया यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मोहालीतील न्यायालयाने रविवारी मजीठिया यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याप्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अकाली नेत्याला नाभा तुरुंगात पाठविले जाणार आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी 18 जुलै रोजी होणार आहे. मजीठिया यापूर्वी 14 दिवसांपर्यंत दक्षता विभागाच्या कोठडीत होते. हिमाचल प्रदेश आणि उत्तरप्रदेशसह अनेक राज्यांमधील मजीठिया यांच्या ‘अवैध स्वरुपात प्राप्त’ संपत्तींशी संबंधित चौकशीचा दाखला सरकारी वकिलाने सुनावणीवेळी दिला होता. तर मजीठिया यांनी कोठडीच्या आदेशाला अवैध ठरवत न्यायालयात आव्हान दिले होते. राजकीय सूडापोटी ही कारवाई करण्यात आली असून याचा उद्देश केवळ मला बदनाम करणे आणि त्रास देणे आहे. मी एक प्रखर टीकाकार असल्यानेच राज्य सरकारकडून ही कारवाई करण्यात आल्याचा दावा मजीठिया यांनी स्वत:च्या याचिकेत केला आहे. दक्षता विभागाने 25 जून रोजी मजीठिया यांना अमृतसर शहरातील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली होती.









