उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका : बँक खात्यांवरील निर्बंध कायम राहणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्ली उच्च न्यायालयाकडून काँग्रेस पक्षाला गुरुवारी मोठा झटका बसला आहे. न्यायालयाने कर अधिकाऱ्यांकडून काँग्रेसच्या विरोधात चार वर्षांच्या कालावधसाठी टॅक्स रिअसेसमेंटची कार्यवाही सुरू करण्याच्या निर्णयाला पक्षाने दाखल केलेल्या याचिका फेटाळल्या आहेत. तसेच आता न्यायालयाकडून निर्णय येईपर्यंत काँग्रेसची बँक खाती गोठलेलीच राहणार आहेत. आणखी एक वर्षासाठी कराच्या पुनर्मूल्यांकन करण्यात हस्तक्षेप करण्यासाठी आम्ही यापूर्वीच नकार दिला आहे. तसेच या निर्णयाच्या विरोधात दाखल याचिका पुन्हा फेटाळल्या जात असल्याचे न्यायाधीश यशवंत वर्मा आणि पुरुषेंद्र कुमार यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. हे प्रकरण आकलन वर्ष 2017-21 पर्यंतचे आहे. यापूर्वी काँग्रेस पक्षाने मूल्यांकन वर्ष 2014-15 आणि 2016-17 शी संबंधित पुनर्मूल्यांकन कार्यवाही सुरू करण्याच्या निर्णयाला याचिकेद्वारे न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने काँग्रेसच्या निरर्थक दुष्प्रचाराला धुडकावून लावण्याचे काम पहिल्यांदाच केलेले नाही. काँग्रेसकडे पुरेसा वेळ असताना ते उच्च न्यायालय किंवा अन्य लवादाकडे गेले नाहीत आणि आता राजकीय सूड उगविला जात असल्याची ओरड करत असल्याची टीका भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसवर केली आहे. काँग्रेसच्या परिवाराच्या अस्तित्व किंवा त्यांच्या भ्रष्टाचारावर जनतेने ठोस प्रहार केला तर ते याला लोकशाहीवरील हल्ला ठरवितात असा आरोपही पूनावाला यांनी केला आहे.









