ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
गुलाम नबी आझाद यांनी जम्मू आणि काश्मीर कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये बंडाचे संकेत दिल्यावर काही दिवसांनंतर लगेच काँग्रेस जेष्ठ नेते आनंद शर्मा यांनी आज हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षीय सल्लामसलत करताना कॉंग्रेस पक्षाने त्यांच्याकडे “दुर्लक्ष” केल्याचा आरोप त्यांनी केला.
माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांची २६ एप्रिल रोजी हिमाचल प्रदेशातील सुकाणू समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. शर्मा हे हिमाचल प्रदेशातील सर्वात जेष्ठ नेत्यांमध्ये गणले जातात. कॉंग्रेस पक्षाच्या कोणत्याही बैठकीत सल्ल्यासाठी विचारले न गेल्याने किंवा निमंत्रित न केल्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला गेल्याचे त्यांनी आपल्या पत्रात काँग्रेस अध्यक्षांना सांगितले आहे. काँग्रेस हिमाचल प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून सत्ता काढून घेण्याच्या प्रयत्न करत असतानाच हिमाचल कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.