प्रशांत क्षेत्रातील देशांची भूमिका ः ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय
वृत्तसंस्था/ मेलबर्न
चीनकडून ऑस्ट्रेलियाची कोंडी करण्यासाठी प्रशांत महासागर क्षेत्रातील 10 देशांसोबत सुरक्षा करार करण्याच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. प्रशांत क्षेत्रातील देशांच्या दौऱयावर गेलेले चीनचे विदेशमंत्री वांग यी यांना रिकाम्या हातांनी परत यावे लागले आहे. प्रशांत क्षेत्रातील देशांनी चीनसोबत व्यापार तसेच सुरक्षा करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. वांग यी यांनी फिजीमध्ये 10 देशांच्या विदेश मंत्र्यांसोबत बैठक घेतली, परंतु चीनसोबत सुरक्षा आणि आर्थिक करारावर कुठलीच सहमती निर्माण होऊ शकलेली नाही.
या 10 देशांसोबत चीन मुक्त व्यापार, पोलीस सहकार्य आणि आपत्ती व्यवस्थापनावरून व्यापक करार करू इच्छित होता. प्रशांत क्षेत्रातील देश स्वतःच्या भूमिकेवरून एकजूट आहेत. नेहमीप्रमाणे आम्ही प्रथम आम्ही आमच्या 10 देशांमध्ये नव्या क्षेत्रीय करारावर परस्पर चर्चेतून सहमती तयार करू. चीनसोबत हवामान बदल आणि उत्सर्जन कमी करण्यासंबंधी ठोस उपाययोजना इच्छित असल्याचे उद्गार फिजीचे पंतप्रधान प्रँक बेनमिरामा यांनी काढले आहेत.
वांग यी यांचे स्पष्टीकरण
याचदरम्यान फिजीमधील चीनचे राजदूत किआन बो यांनी प्रशांत क्षेत्रातील काही देशांनी चीनच्या व्यापक प्रस्तावांपैकी काही मुद्दय़ांवर आक्षेप घेतले होते असे म्हटले आहे. राजनयिक संबंध प्रस्थापित असलेल्या 10 देशांसाठी समर्थन आहे. परंतु निश्चितपणे काही विशेष मुद्दय़ांवर काही चिंता आहेत. आम्ही लवकरच आमची भूमिका स्पष्ट करू. आमच्या मित्रांसोबत आम्ही सातत्याने संपर्कात आहोत असे किआन बो यांनी म्हटले आहे.
चीनचा दावा
कुठल्याही देशावर काहीच न लादण्याचे चीनचे धोरण आहे. फिजीसोबत आम्ही तीन करार केले असून हे सर्व आर्थिक विकासाशी निगडित असल्याचे चिनी राजदूताने म्हटले आहे. कुठल्याही राजनयिक अटीशिवाय प्रशांत महासागर क्षेत्रातील देशांना मदत करत राहणार आहोत. प्रशांत क्षेत्रातील देशांचा चीन दीर्घकाळापासून मित्र असल्याचे वांग यी यांनी म्हटले होते. चीनने काहीही दावा केला असला तरीही अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या कराराला स्वतःच्या विरोधात मानत होते. चीन क्वाड आणि ऑकसच्या प्रत्युत्तरादाखल हा करार घडवून आणत होता असे मानण्यात येते.









