पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांची माहिती : पाच हजार पोलीस तैनात करणार
बेळगाव : पुढील आठवड्यापासून येथील सुवर्णविधानसौधमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन बंदोबस्तासाठी पोलीस दलाने सर्व तयारी केली आहे. यासाठी पाच हजार पोलीस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी दिली. सोमवारी भेटीसाठी आलेल्या पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली आहे. अधिवेशनाच्या काळात बेळगावात कडेकोट बंदोबस्त असणार आहे. परजिल्ह्यातून बंदोबस्तासाठी येणारे अधिकारी व पोलिसांची निवास, भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. तब्बल पंधरा ठिकाणी पोलिसांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही आयुक्तांनी सांगितले. 5 एसपी, 12 एएसपी, 42 डीएसपी, 100 सीपीआय, 250 पीएसआय, 3 हजारहून अधिक वाहतूक व नागरी पोलीस, राज्य राखीव दलाच्या 35 तुकड्या बंदोबस्तासाठी मागविण्यात आल्या आहेत. सुवर्णविधानसौधजवळ 200 पीएसआय व 1800 पोलिसांसाठी टाऊनशीप उभारण्यात येत आहे. उर्वरित अधिकारी व पोलिसांची राज्य राखीव दलाचे मच्छे व मार्केटयार्ड येथील बटालियन, पोलीस मुख्यालयातील वीरभद्र मंदिर, सांबरा, मुक्तीमठ, खानापूर येथील पोलीस ट्रेनिंग सेंटरसह पंधरा ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या पोलिसांना आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असून उत्तमरित्या जेवण पुरविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने सर्व व्यवस्था करण्यात येत असून तयारीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. या कामांचा बैठकीत आढावाही घेण्यात आला आहे. गुप्तचर विभाग, स्फोटक तज्ञ आदी अनेक विभाग अधिवेशनाच्या काळात कार्यरत असणार आहेत, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.
अर्ज आल्यावर निर्णय!
अधिवेशनाच्या काळात महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महामेळावा भरविला जातो. मेळाव्याला परवानगी देणार का? या प्रश्नावर यासाठी आपल्याकडे अद्याप अर्ज आला नाही. अर्ज आल्यावर त्यावर निर्णय घेऊ, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.









