सुवर्ण पदक विजेत्यास प्रत्येकी 5 लाख, रौप्यपदक विजेत्यास 3 लाख, कांस्य पदक विजेत्यास 1 लाख ऊपयांचे रोख पारितोषिक देण्याची मुख्यमंत्र्यांचे अभिवचन
पणजी : 17 ते 25 जून दरम्यान बर्लिन येथे 2023 स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड समर गेम्समध्ये गौरवशाली व असामान्य कामगिरी करत पदक जिंकलेल्या गोमंतकीय खेळाडूंच्या पथकाचा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सत्कार केला. आयोजित विशेष सत्कार समारंभामध्ये गोव्यातील 15 खेळाडू आणि 8 प्रशिक्षक यांचा समावेश होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले आमच्या विशेष खेळाडूंनी पदके जिंकत आपणा सर्वांना अभिमानाचे क्षण दिले आहेत. त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत मोठे धैर्य, जिद्द आणि कौशल्य दाखवले आहे. मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, राज्य सरकार प्रत्येक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूस 5 लाख ऊपये, रौप्यपदक विजेत्यास 3 लाख ऊपये आणि कांस्य पदकासाठी 1 लाख ऊपयांचे रोख बक्षीस देईल. दोन महिन्यांत त्यांना बक्षिसाची रक्कम दिली जाईल. शिवाय, आम्ही त्यांना भविष्यात सरकारी क्षेत्रात काम करण्याची संधी देऊ. या पाठबळासाठी आणि प्रोत्साहनासाठी हे खेळाडू पात्र ठरले आहेत. सुभाष फळदेसाई म्हणाले, गोव्याला नावलौकिक मिळवून देतानाच आपल्या यशस्वी कामगिरीचे शिखर चढण्यासाठी या विशेष खेळाडूंनी खूप मेहनत घेतली. पदक मिळाले असो वा नसो, या स्पेशल ऑलिम्पिक जागतिक उन्हाळी स्पर्धेत सहभागी झालेला तुमच्यातील प्रत्येकजण खरोखरच खास आणि विजेता आहे. आमचे सरकार दिव्यांगजनांना हितकारी, लाभदायी, सुलभ अशा धोरणांची अंमलबजावणी करण्यावर काम करत आहे. दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना जीवनाच्या विविध क्षेत्रात अधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी हे धोरण योग्य दिशेने जात आहे. विशेष ऑलिम्पिकसाठी भारतीय तसेच गोमंतकीय पथकास पाठबळ व मार्गदर्शन करण्याची जबाबदारीही गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाने चोखपण पेलली, असेही फळदेसाई म्हणाले.
राज्य दिव्यांगजन आयुक्त गुऊप्रसाद पावसकर म्हणाले, तब्बल 19 पदके जिंकून आपले राज्य आणि देशासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये आपले स्थान आहे ही एक प्रेरणादायी बाब या खेळाडूंकडे आहे. गोव्यातील एकूण 15 खेळाडू आणि 8 प्रशिक्षक भारतीय संघात होते. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत अतुलनीय कौशल्य, जिद्दीची भावना आणि खेळभावनेप्रती परिपूर्ण समर्पणाचे दर्शन घडवले. स्पेशल ऑलिम्पिक भारतचे राष्ट्रीय क्रीडा संचालक व्हिक्टर वाझ यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, यंदाची पदक तालिका गोव्याच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट आहे. 9 सुवर्ण, 5 रौप्य आणि 5 कांस्यपदकांसह ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या कामगिरीसह गोव्याने आता तीन अंकी पदकांचा टप्पा ओलांडला आहे. आम्ही आतापर्यंत सहभागी झालेल्या 8 स्पर्धांमध्ये एकूण 102 पदके कमावली आहेत. यापैकी कोणतेही यश सहज मिळालेले नाही. त्यासाठी महिनो न् महिने अचूक नियोजन करावे लागले. आमच्या संघाचा गाभा किमान 2 वर्षांपूर्वी तयार झाला होता. सर्वांच्या समर्पणामुळे आज आपण ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी साजरी करत आहोत. भारताच्या पथकामध्ये गोव्यातील 13 खेळाडूंचा सहभाग राहिला. यामध्ये युनिफाइड फुटबॉल (पुऊष आणि महिला), फुटसल (पुऊष), ऍथलेटिक्स (पुऊष आणि महिला), रोलर स्केटिंग (महिला), बास्केटबॉल (पुऊष आणि महिला), ज्युडो (पुऊष आणि महिला), पॉवरलिफ्टिंग (महिला), युनिफाइड व्हॉलीबॉल (पुऊष आणि महिला) आणि हँडबॉल या क्रीडाप्रकारांत गोमंतकीय खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व केले. स्पेशल ऑलिम्पिक जागतिक क्रीडा स्पर्धा 2023मध्ये 190 देशांतील 7000हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
सुभाष फळदेसाई यांच्याकडून समर्पण, कऊणा याचे दर्शन. अशा क्रीडा स्पर्धेमध्ये इतर देशांतील मंत्री केवळ उद्घाटन आणि समारोप समारंभांना उपस्थित राहतात. पण गोव्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई आणि राज्य दिव्यांगजन आयोगाचे आयुक्त गुऊप्रसाद पावसकर हे संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंसोबत राहिले. त्यांनी या खेळाडूंना सतत प्रेरणा दिली, त्यांची योग्य काळजी घेतली आणि परदेशातही घरच्यासारखे वातावरण उपलब्ध होईल याची निश्चिती केली. समर्पण आणि कऊणा या गुणांसाठी मंत्री सुभाष फळदेसाई यांनी नवे आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे हे कार्य गोवा राज्य नेहमीच लक्षात ठेवेल.”
– डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री
सत्कारमूर्ती गोमंतकीय खेळाडू असे :
वेन्सन पेस, जोएल रॉड्रिग्स, फ्रान्सिसा पारिसापोगु आणि अमन नदाफ (सुवर्णपदक, 7-ए-साइड फुटबॉल), मनफिल फेर्राव (सुवर्णपदक, बास्केटबॉल), वीणा नाईक (सुवर्णपदक, युनिफाइड व्हॉलीबॉल), गीतांजली नागवेंकर (सुवर्णपदक 800 मीटर आणि रौप्य पदक 400 मीटर), असलम गंजनवार (रौप्यपदक, ज्युदो), आयुष गाडेकर (रौप्यपदक, व्हॉलीबॉल युनिफाइड), तानिया उसगांवकर (रौप्य आणि कांस्य, स्केटिंग) आणि सिया सरोदे (सुवर्णपदक- डेडलिफ्ट आणि स्क्वॅट, रौप्य पदक- कम्बाईन लिफ्ट आणि कांस्यपदक- बेंच प्रेस), गेबन मुल्ला (कांस्यपदक, मिनी भालाफेक), गायत्री फातर्पेकर आणि काजल जाधव (कांस्यपदक, 7-ए-साइड फुटबॉल) आणि आसिफ मलानी (4थे स्थान 4×400 मीटर रिले). सत्कार करण्यात आलेले गोव्यातील आठ प्रशिक्षक असे : वर्षा नाईक, प्रकाश वेळीप, गौतमी देसाई, समंथा डिकोश्ता, सफिरा डिकोश्ता, काझमिरो फर्नांडिस, सीनियर मोनिका कुइलो आणि प्रशांत तारी.









