ईडीकडून 29 ठिकाणी छापे : अमेरिकेच्या ‘डर्टी हॅरी’शी कनेक्शन
वृत्तसंस्था/ गांधीनगर
ईडीने सोमवारी गुजरातमध्ये मानवी तस्करी सिंडिकेटच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. ईडीने गुजरातच्या 29 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले आहेत. मेक्सिको आणि कॅनडाच्या मार्गे भारतीयांना अमेरिकेत अवैधमार्गाने नेणाऱ्या टोळीच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
गुजरात पोलिसांनी काही आठवड्यांपूर्वी एका इसमाला अटक केली होती. मागील वर्षी 19 जानेवारी रोजी मारले गेलेल्या 4 जणांच्या मृत्यूच्या चौकशीदरम्यान संबंधिताला अटक करण्यात आली होती. अमेरिकेत शिकागो पोलिसांनी 21 फेब्रुवारी रोजी हरकेश कुमार याला अटक केली होती. मानव तस्करीच्या वर्तुळात त्याला डर्टी हॅरी या नावाने ओळखले जाते. एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यूप्रकरणी ही अटक करण्यात आली होती.
ईडीने गुजरात पोलिसांकडून मानव तस्करीच्या 3 प्रकरणांचा तपास स्वत:च्या हातात घेतला आहे. भरतभाई उर्फ बॉबी पटेल, राजू भाई प्रजापति आणि भावेश पटेल आणि इतरांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा नोंद आहे.
गुजरातपासून अमेरिकेपर्यंत नेटवर्क
डर्टी हॅरी उर्फ हरकेश कुमार अमेरिकेतील बॉबी पटेलच्या संपर्कात होता. हे सर्व मिळून मानव तस्करीचे सिंडिकेट चालवत होता, असा संशय तपास यंत्रणांना आहे. हे सिंडिकेट गुजरातसोबत केरळ आणि पंजाबच्या लोकांना मानवी तस्करीद्वारे फ्रान्स, स्पेन, एस्टोनिया, कॅनडा आणि निकारागुआ येथे पाठविते. या मानवी तस्करीचे सिंडिकेट चालविण्यासाठी हवाला एजंट्स आणि फॉरेक्स एक्सचेंज कंपन्यांची मदत घेतली जात होती असे तपासात दिसून आले आहे.
कोट्यावधींचा खेळ
आरोपींच्या ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यांदरम्यान तपास यंत्रणांनी मोठ्या संख्येत पासपोर्ट, ओळखपत्रे, छायाचित्रे, मालमत्तांचे दस्तऐवज, डिजिटल उपकरणे, काही बँक खात्यांशी निगडित कागदपत्रे आणि 2 आलिशान कार्स हस्तगत केल्या आहेत. मानवी तस्करीसाठी एका व्यक्तीकडून 60-75 लाख तर जोडप्याकडून 1-1-1.25 कोटी रुपयांची मागणी केली जात होती. दांपत्यासोबत मुले असल्यास ही रक्कम 2 कोटीपर्यंत पोहोचत होती असे तपासात आढळून आले आहे.









